स्मारकांपेक्षा लाेकांच्या जगण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा : प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 01:57 PM2019-09-23T13:57:54+5:302019-09-23T14:02:55+5:30
खासगी धरणांमधील पाणी वीजनिर्मिती ऐवजी दुष्काळी भागाला देण्यात यावे अशी भूमिका वंचित आघाडीने मांडली.
पुणे : महापुरुषांची स्मारकं गरजेची आहेतच परंतु त्याहीपेक्षा लाेकांच्या जगण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचे म्हणत खासगी धरणांमधील पाणीदुष्काळी भागाला देण्यात यावे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. आंबेडकर म्हणाले, राज्यात काही भाग ओला आहे तर काही भाग हा दुष्काळी आहे. राज्यात जशी सरकारी धरणं आहेत तशीच अनेक खाजगी धरणे देखील आहेत. टाटाच्या पाच धरणांमधून वीज निर्मिती केली जाते. सध्या राज्यात विजेचे अतिरिक्त उत्पादन हाेत आहे. विजेची जास्त मागणी असते तेव्हा देेखील अतिरिक्त वीज उरत आहे. त्यामुळे या धरणांमधून करण्यात येणारी वीज निर्मिती टप्प्याटप्प्याने बंद करुन या धरणांमधील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावे. टाटा धरणामधील पाणी नद्यांच्या मार्फत उजनी धरणापर्यंत पाेहचवता येईल. तसेच तेथून मराठवाड्यातील विविध भागाला पाणी पुरवता येईल. वंचित सत्तेत आल्यास टाटा ग्रुपशी बाेलून ही याेजना अमलात आणता आणेल असा विश्वास देखील त्यांनी यावेेळी व्यक्त केला.
तसेच वीज निर्मिती करण्याचे इतर मार्ग असून त्याचा विचार सरकारने करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच सध्या राज्यात वीजेचा कृत्रिम तुटवडा असून सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास वीज सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाेहचविता येणे शक्य असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले. पाण्याचे समन्यायी वाटप हे वंचितचे धाेरण असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी घाबरुन वंचित विराेधपक्ष असेल असे म्हंटले
मुख्यमंत्र्यांनी वंचित हे विराेधपक्षात असेल असे म्हंटले हाेते, ते त्यांनी वंचितला घाबरुन म्हंटले हाेते. आम्ही विराेधीपक्षात नाहीतर सत्तेत असू असा विश्वास देखील आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केला.