सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत;पुण्यातील घटनेवरुन राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:46 AM2023-06-28T10:46:14+5:302023-06-28T10:58:23+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील आज ट्विट करत संताप व्यक्त केला.

People's eyes are sufficiently illuminated by beautification; Raj Thackeray's criticism of the government on the incident in Pune | सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत;पुण्यातील घटनेवरुन राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत;पुण्यातील घटनेवरुन राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

googlenewsNext

पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी माथेफिरू तरुणाने तरुणीवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यामुळे शहर हादरले. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे या तरुणाने साहसी प्रसंगावधान दाखविल्यामुळे तरुणी थोडक्यात बचावली. पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला अटक केली आहे. 

सदर घटनेवरुन राज्यातील राजकीय नेत्यांनी निषेध नोंदवत प्रतिक्रिया दिली. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी देखील आज ट्विट करत संताप व्यक्त केला. काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले. 

दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी, असा सल्ला राज ठाकरेंनी यावेली दिला. तसेच माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा, असं आवाहन देखील राज ठाकरेंनी यावेळी केलं.

धाडसी तरुण काय म्हणाला?

मला एक मुलगी धावताना दिसली. वाचवा वाचवा, असे म्हणत ती धावत होती. मागून एक मुलगा हातात कोयता घेऊन धावत होता. हा सगळा प्रकार बघून लोक बाजूला होत होते. मला ती माझ्या बहिणीसारखी वाटली. मी मागचा पुढचा विचार न करता पुढे झालो.  तो मुलगा वार करण्याच्या प्रयत्नात असताना मी त्याचा कोयता पकडला. इतक्यात एक मुलगा आला. त्याने त्याला मागून पकडले. एका मुलीचा जीव वाचवू शकलो, याचे समाधान आहे, असं लेशपाल जवळगे या धाडसी तरुणाने सांगितले.

नेमकं घडलं काय?

शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे हल्लेखोराचे नाव आहे. या घटनेत २१ वर्षीय तरुणी थोडक्यात बचावली असून, किरकोळ जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी टिळक रोडवरील एका इन्स्टिट्यूटमध्ये इंटेरियर डिझायनरच्या प्रथम वर्षात शिक्षण घेते. कोथरूडमधील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना तिचा शंतनूशी परिचय झाला होता. मैत्री आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, शंतनू किरकोळ कारणावरून तरुणीला शिवीगाळ करून मारहाण करीत असे. त्यामुळे तरुणीने डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले. त्यानंतरही तो तरुणीला फोन करून धमकावत होता. त्यामुळे तिने त्याला ब्लॉक केले होते. मंगळवारी सकाळी तरुणी सदाशिव पेठेत आल्यानंतर शंतनूने तिच्यासह तिच्यासोबत असलेल्या मित्राला लक्ष्य केले व भररस्त्यात कोयता काढून तो तिच्या अंगावर धावून गेला. यावेळी तेथील लेशपाल या तरुणाने माथेफिरूचा हात पकडला आणि त्याला रोखले. त्यानंतर आसपासचे  इतर तरुणही पुढे आले. त्यांनी माथेफिरू हल्लेखोराला रोखले आणि बेदम चोप देऊन पोलिसांच्या  हवाली केले. 

Web Title: People's eyes are sufficiently illuminated by beautification; Raj Thackeray's criticism of the government on the incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.