ग्रामसभांमध्ये लोकांचा सहभाग वाढविणार - सूरज मांढरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:00 AM2018-01-05T02:00:46+5:302018-01-05T02:01:27+5:30
ग्रामसभांमध्ये लोकांचा सहभाग वाढवून विधायक कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेत नावीन्यपूर्ण योजनांबरोबर राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. नव्या गोष्टी, प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न असून, वास्तूमधील १९ विभागांतील अधिका-यांनी जिल्ह्यात भेट देताना फक्त स्वत:च्या खात्याच्या कामाचीच पाहणी करू नये, तर सर्वच विभागांतील कामांची पाहणी करून तसा अहवाल द्यावा. प्रत्येक अधिकारी हा जिल्हा परिषदेचा दूत झाला पाहिजे. प्रत्येक खाते दुसºया खात्यांशी एकरूप असावे. जिल्हा परिषदेत कर्मचा-यांची संख्या मोठी आहे; त्यामुळे प्रत्येक कर्मचा-यामध्ये असलेल्या कौशल्याचा चांगला वापर करण्यावर भर राहील. तसेच, ग्रामसभांमध्ये लोकांचा सहभाग वाढवून विधायक कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
सूरज मांढरे म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या पंंचायत विभागाचे १३ तालुक्यांत कार्यक्षेत्र असून, एकूण १,४०५ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावागावांमध्ये विकासाची कामे करण्यात येतात. या सर्व गावांतील ग्रामसभांमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवून विकासकामे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणार आहे. त्या दृष्टीने सर्व नियमित बैठका घेऊन झालेल्या कामांचा आढावा आणि विविध उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविणार आहे.
जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, बांधकाम (दक्षिण व उत्तर), वित्त, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, सामान्य प्रशासन विभागासह इतर एकूण १९ विभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील १३ पंचायत समित्या, असे मोठे कार्यक्षेत्र असणारी आणि राज्यातील सर्वांत मोठा अर्थसंकल्प असलेली पुणे जिल्हा परिषद एकमेव आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाºया कर्मचाºयांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी कर्मचारीहित सप्ताहाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सूरज मांढरे यांनी सांगितले.
कर्मचारीहित सप्ताह साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करणार आहे़ त्याचबरोबर लोकशाही दिनाच्या धर्तीवर ‘कर्मचारी तक्रार निवारण दिन’ प्रत्येक महिन्याच्या पहिल्या अथवा दुसºया सोमवारी घेणार आहे.
जिल्हा परिषदेत नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवसापासून कर्मचारी आपल्या तक्रारी व प्रलंबित प्रश्नांसाठी थेट अर्ज करू शकतील, अशी सोय केली आहे़ कर्मचाºयांनी केलेले अर्ज, तक्रारी त्याच दिवशी संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतील.
या अर्जांवर एक आठवड्यात कार्यवाही करण्यााच्या सूचना संबंधित सर्व खातेप्रमुखांना दिले आहेत. प्रलंबित प्रकरणे व तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा गोषवारा ई-मेलद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दर सोमवारी पाठविणे प्रत्येक खातेप्रमुखांवर बंधनकारक असेल़
राज्यात सर्वाधिक मोठी आणि चांगली जिल्हा परिषद म्हणून पुण्याचा उल्लेख होतो. जिल्हा परिषदेचा पूर्वीपासून वेगळा नावलौकिक आहे. तिची वेगळी उंची आहे. ती उंची टिकविण्याबरोबर चांगल्या यशाच्या शिखरावर पोहोचविण्याचे आव्हान आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न असल्याचे सूरज मांढरे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुखांनी जिल्हा दौरा करताना स्वत:च्या विभागासह इतर विभागांमध्येही जाऊन मूलभूत बाबींची पाहणी करावी; त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार
नाही. याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामांची गती वाढण्यास मदत
होणार असून, सर्वसामान्यांची होणारी गैरसोय टळेल.
दररोज एखाद्या तरी अधिकाºयाचा दौरा जिल्ह्यात आयोजित केला जातो. त्या वेळी अधिकाºयाने स्वत:चे नियोजित काम सांभाळून जिल्हा परिषदेशी संबंधित विभागांमध्ये जाऊन तेथे नागरिकांना सोयीसुविधा दिल्या जातात का, त्यांची गैरसोय होते का किंवा त्यांना काय अडचणी भेडसावतात, याबाबत पाहणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.
त्यामुळे संबंधित ठिकाणचे कर्मचारी व अधिकाºयांना या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील विभागप्रमुख येऊन पाहणी करतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रत्येक जण जागरूक राहील आणि नागरिकांच्या हितासाठी बांधील राहील, असा संदेश या माध्यमातून जाईल, असे मांढरे यांनी सांगितले.