विकास आराखड्यावर लोकप्रतिनिधींनी सूचना कराव्यात : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:15+5:302021-07-31T04:12:15+5:30
पुणे : पीएमआरडीएने (पुणे महानगर विकास प्राधिकरण) २३ गावांचा विकास आराखडा तयार केला असून, यास मुख्यमंत्र्यांनी कालच परवानगी दिली ...
पुणे : पीएमआरडीएने (पुणे महानगर विकास प्राधिकरण) २३ गावांचा विकास आराखडा तयार केला असून, यास मुख्यमंत्र्यांनी कालच परवानगी दिली आहे़ आता महापालिकेत समाविष्ट झालेल्या या २३ गावांबाबत पुण्यातील लोकप्रतिनिधींना आराखड्यात काही सूचना करायच्या असतील तर त्यांनी कराव्यात़ शहरहिताचा विचार करताना त्यामध्ये कुठलेही राजकारण असू नये, हीच आमची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले़
वनाज ते आयडियल कॉलनी मेट्रोचा ट्रायल रन शुक्रवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ पवार म्हणाले, पुणे नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यांचा पुढील ५० वर्षांचा विचार करून वाहतूक, शिक्षण, उद्योग, पर्यावरण आदी बाबींचा विचार करून पीएमआरडीएकडून हा विकास आराखडा तयार करण्याता आला आहे़ पीएमआरडीए हे राज्यातील सर्वात मोठे आणि देशातील तिसरे सर्वात मोठे नगर विकास प्राधिकरण झाले आहे. विकास ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असल्याने, त्यामध्ये राजकारण न करता तो गतीने कसा पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करणे हे महाविकास आघाडीचे धोरण आहे.
लोकशाहीमध्ये सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. २३ गावांसह साडेसहा हजार किलो मीटर क्षेत्रफळाचा विचार करून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये १० मेट्रो मार्ग, २ रिंगरोड, ११ बिझिनेस हब, शैक्षणिक संस्था, क्रीडा विद्यापीठ, संशोधन संस्था, क्रीडा संकुल अशा विविध बाबींचा त्यामध्ये विचार करण्यात आला आहे. पुण्यातील लोकप्रतिनिधींनीची याबाबत काही सूचना असतील त्यात काही गैर नाही. महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही काल बैठकीत त्यांचे मुद्दे मांडले. खासदार गिरीश बापट व अन्यही लोकप्रतिनिधींच्या काही सूचना असतील त्यांनी त्या सूचना मांडाव्यात. आराखडा अंतिम करताना त्या सूचनांचा निश्चितच विचार केला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.