गरवारे कॉलेजमधील शिपाई ते नगरसेवक
By Admin | Published: February 24, 2017 03:16 AM2017-02-24T03:16:20+5:302017-02-24T03:16:20+5:30
मूळच्या सोलापूरच्या असलेल्या व यमगरवाडी या पारधी समाजातील मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेतील पहिल्या
पुणे: मूळच्या सोलापूरच्या असलेल्या व यमगरवाडी या पारधी समाजातील मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेतील पहिल्या विद्यार्थी राजश्री काळे या प्रभाग ७ अ मधून निवडून आल्या. पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणारी एक कार्यकर्ती नगरसेविका झाली आहे़
नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर विजयाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता़
राजश्री काळे यांनी सांगितले की, वयाच्या १० व्या वर्षांपासून पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात काम करू लागले़ पारधी समाजातील मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेत यमगरवाडीत काही काळ शिक्षण घेतले़ रात्रशाळेतून ९ वीपर्यंत शिक्षण घेतले . त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करू लागले़ राजश्री आदिवासी पारधी संघटनेची स्थापना करून या संघटनेच्या माध्यमातून काम सुरू केले आहे़ २००४ मध्ये पुण्यात आल्यानंतर आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शिपाई म्हणून काम करीत आहे़
पारधी समाजाकडे आजही गुन्हेगारी जमात म्हणून पाहिले जाते़ समाजाला स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत़ त्यांच्यासारख्या कार्यकर्त्या महिलेला भाजपाने तिकीट दिले़ विशेष म्हणजे त्यांच्या प्रभाग क्रमांक ७ मधून सर्वाधिक ५ हजार २२३ मतांनी विजयी झाल्या आहेत़
(प्रतिनिधी)
हा विजय मित्र,मैत्रिणी यांच्यामुळे शक्य झाला आहे़ पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे यांनी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला
- राजश्री काळे,
नगरसेविका, भाजपा