लाचखोरीतली टक्केवारी... ‘वर सोळा जणांना द्यावे लागतात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:15 AM2021-08-20T04:15:19+5:302021-08-20T04:15:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी तक्रारदार ठेकेदाराला ‘ते वर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी तक्रारदार ठेकेदाराला ‘ते वर सोळा जणांना द्यावे लागतात’ असे सांगितल्याचे तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनीच पिंगळे यांना ‘३ टक्क्यांऐवजी २ टक्के करा’ असे आदेश दिल्याचे संभाषण व्हॉईस रेकॉर्डवर रेकॉर्ड झाले आहे. त्यानुसार हे एक प्रकारचे मोठे रॅकेट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे याचा तपास करणे गरजेचे असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर लांडगे यांच्यासह पालिकेतील पाच जणांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी दिला.
नितीन लांडगे यांच्यासह ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (स्वीय सहायक, वय ५६, रा. रामनगर सोसायटी, गव्हाणेनगर, भोसरी), अरविंद भीमराव कांबळे (शिपाई, रा. भीमनगर पिंपरी), राजेंद्र जयवंत शिंदे (संगणक ऑपरेटर रा. जय मल्हार, थेरगाव, वाकड), विजय शंभुलाल चावरिया (लिपिक, रा. धर्मराजनगर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार हा जाहिरात ठेकेदार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेडील २६ वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी त्यांनी निविदा भरल्या होत्या. २०१९ व २०२० च्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र वर्क ऑर्डर निघाली नसल्याने त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोली रकमेच्या बीड रकमेच्या ३ टक्के रकमेनुसार दहा लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती सहा लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील १ लाख १८ हजार रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले आणि उर्वरित रक्कम वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर देण्याचे ठरले. मात्र १ लाख १८ हजार रुपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आणि पाच जणांना अटक केली.
गुरुवारी (दि.१९) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. नितीन लांडगे यांच्या मालमत्तेचा शोध सुरू असून, त्यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. त्यांची याव्यतिरिक्तही मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच सापळा कारवाई दरम्यान पिंगळे यांच्याकडे अंगझडती आणि कार्यालय झडती दरम्यान ५ लाख ६८ हजार ५६० रुपयांची रक्कम मिळाली असून, त्यातील ५ लाख २० हजार रुपये स्थायी समितीच्या सभापतींना देण्यात आल्याचे पिंगळे यांनी सांगितले आहे. या रकमेचा तपास करायचा आहे. राजेंद्र शिंदे यांच्याकडेही २४ हजार ४८० रुपयांची रक्कम मिळाली आहे. या सर्व गुन्ह्याच्या सखोल तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील अॅड. रमेश घोरपडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
----------------