टक्केवारी वाढल्याने प्रशासनासमोर मतमोजणीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:20 AM2020-12-03T04:20:55+5:302020-12-03T04:20:55+5:30
-मतमोजणीसाठी बाराशे कर्मचारी, सातशे पोलिसांचा बंदोबस्त लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार ...
-मतमोजणीसाठी बाराशे कर्मचारी, सातशे पोलिसांचा बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले आहे. या मतदार संघातील सर्व जिल्ह्यातील मतदान पेट्या पुण्यातील बालेवाडीत गुरूवारी (दि. १) पहाटेपर्यंत पोहचतील. त्यानंतर बुधवारी (दि. ३) येथे मतमोजणी सुरु होईल. परंतु उमेदवारांची प्रचंड संख्या, त्यात झालेले भरघोस मतदान आणि मतमोजणीची किचकट प्रक्रिया यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर होण्यास शुक्रवारची दुपार अथवा सायंकाळपर्यंत जाहीर होईल असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात मतदान झाले. गुरूवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी तब्बल बाराशे कर्मचारी आणि सातशे पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यात पदवीधर मतदार संघासाठी ११२ टेबल व शिक्षकसाठी ४२ टेबल लावण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
चौकट
अशी होते मतमोजणी
-पदवीधर व शिक्षक मतदार संघातील सर्व जिल्ह्याच्या मतपत्रिका एकत्र करणार.
-मतपत्रिकांची मोजणी करून स्वतंत्र ट्रेमध्ये ठेवणार. त्यानंतर वैध व अवैध मतपत्रीका वेगळ्या काढणार.
-एकूण वैध मतपत्रीका निश्चित झाल्यानंतर उमेदवार निवडून येण्यासाठीचा मतदानाचा कोटा निश्चित केला जाईल. यात एकूण वैध मतदान व एकूण उमेदवारांनुसार हा कोटा निश्चित होईल. उदाहरणार्थ एकूण वैध मतदान ८०० असेल तर भागिले २ निवडून द्यावयाची संख्या १ : पहिल्या पसंती क्रमांकात निवडून येण्याचा मतांचा कोटा ४०१ असे निश्चित केले जाईल.
-त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. पहिल्या पसंती फेरीत निश्चित केलेल्या कोट्याएवढे मतदान झाल्यास संबंधित उमेदवार निवडून आल्याचे जाहीर केले जाईल. तसे न झाल्यास दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजावी लागतील. असे झाल्यास मतमोजणीची प्रक्रिया लांबू शकते.