विद्यापीठात वाढतोय संशोधनाचा टक्का
By admin | Published: February 28, 2015 02:22 AM2015-02-28T02:22:15+5:302015-02-28T02:22:15+5:30
विद्यार्थ्यांना संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या
पुणे : विद्यार्थ्यांना संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे संशोधनाचा टक्का वाढत आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये ४०५ जणांनी विविध विषयांत संशोधन करीत पीएचडी पदवी मिळविली. मागील वर्षी ही संख्या ३३० एवढी होती.
विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या सोमवारी होत आहे. त्यानिमित्त शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमागील आवारात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवी प्रदान होणार आहे. यामध्ये एकूण ८८ हजार ३०६ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान केली जाणार आहे. त्यापैकी ४०५ पीएचडी पदवीधारक आहेत. एकूण १०० सुवर्णपदके ६१ विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.
मागील काही वर्षांपासून विद्यापीठातील संशोधनामध्ये वाढ होत आहे. याविषयी बोलताना डॉ. गाडे म्हणाले, विधी, अभियांत्रिकी, वाणिज्य, औषधनिर्माणशास्त्र या विद्याशाखांमध्ये मार्गदर्शक खूप कमी होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळत नव्हती. आता मार्गदर्शकांची संख्या वाढविली आहे. तसेच इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. हा ट्रेंड आशादायी आहे, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.