विद्यार्थी घटल्याने पर्सेंटाईल वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:07 AM2020-12-02T04:07:06+5:302020-12-02T04:07:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी-सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी-सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेस यंदा कमी विद्यार्थी प्रविष्ट झाले. परिणामी विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाईल मिळाले. तसेच सीईटीमध्ये रँक कमी मिळालेल्या विद्यार्थी सुध्दा नाराज होऊ नये. कारण एका पर्सेंटाईलच्या गटातील विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पर्सेंटाईल मिळूनही विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे, असे मत तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
सीईटी-सेल तर्फे अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल नुकताच जाहीर केला. यंदा परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७१.२७ टक्के विद्यार्थ्यांनी म्हणजे ३ लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर २८.७३ टक्के म्हणजेच १ लाख ५१ हजार ८२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट झाले नाहीत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच घटली आहे.
प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक दुर्गेश मंगेशकर म्हणाले की, मागील वर्षी एका पर्सेंटाईल ग्रुपमध्ये २,७०० विद्यार्थी होते. तर यंदा एका ग्रुपमधील विद्यार्थ्यांची संख्या १,७०० एवढी आहे. त्यामुळे यंदा एखाद्या विद्यार्थ्याला ८७ पर्सेटाईल मिळाले असतील, तर मागील वर्षाचा विचार करता संबंधित विद्यार्थ्याला ९२ पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराज होऊ नये. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे पर्सेंटाईलमध्ये बदल झाला आहे.
---
सीईटीत राज्यात प्रथम क्रमांक मिळला असला तरी मी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणार नाही.माझे दहावीपर्यंतचे शिक्षण ज्ञानप्रबोधिनी मध्ये झाले तर अकरावी-बारावीचे शिक्षण पी.जोग मध्ये पूर्ण केले. माझे वडील प्राध्यापक असून आई गृहिणी आहे. कुटुंबाकडून व शिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करता आले.
- सानिका गुमस्ते, विद्यार्थिनी