सुमधूर संगीताच्या आस्वादाची बारमाही संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:15+5:302021-02-07T04:10:15+5:30
पुणे : अभिजात भारतीय संगीताला स्वरतेजाने प्रकाशित करणारे ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त भारतीय-राजभाषा-डिजिटल शब्दकोशांचे निर्माते संगणकतज्ज्ञ व ...
पुणे : अभिजात भारतीय संगीताला स्वरतेजाने प्रकाशित करणारे ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त भारतीय-राजभाषा-डिजिटल शब्दकोशांचे निर्माते संगणकतज्ज्ञ व संगीतप्रेमी नाशिकचे सुनील खांडबहाले यांनी नवकल्पक अशा samaysangit.app अर्थात समय-ऋतुचक्रावर आधारित डिजिटल संगीत वेबसाईटचे ऑनलाईन प्रसारण सुरू केले आहे.
वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित samaysangit.app या वेबसाईटमध्ये दिवसाचे पूर्वान्ह, मध्यान्ह, अपरान्ह, सायंकाल, प्रदोष, निशिथ, त्रियाम, उषा असे आठ प्रहर आणि वर्षभरातील वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा ऋतू या कालचक्रानुसार मौखिक आणि वाद्य संगीत श्राव्य स्वरूपातील स्वयंचलित-तंत्रज्ञान-कार्यप्रणाली प्रसारण-संरचना विकसित केलेली आहे.
कुठल्याही डाउनलोडशिवाय आपल्या मोबाईल अथवा संगणकाच्या एका क्लिकवर संगीतक्षेत्रातील पूर्वसुरींसोबतच नवोन्मुख कलाकारांच्या सुमधूर संगीत श्रवणाच्या मेजवानीचा आस्वाद दिवसातील चोवीस तास व वर्षातील बारा ही महिने संगीतप्रेमींना अखंडपणे घेता येणार आहे. भारतीय संगीत शास्त्राचा प्रचार-प्रसार व्हावा व तरुण पिढीमध्ये सात्विक संगीत श्रवणाची ओढ लागावी या उदात्त हेतूने समयसंगीत ॲप ही सुविधा कोणत्याही नोंदणीशिवाय विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चौकट
“पंडितजींनी स्वर्गीय आवाजाने अजरामर केलेल्या संतवाणीचा विद्यार्थीदशेत माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. संगीत माझ्यासाठी कार्यशक्ती व नवकल्पकता यांचा ऊर्जास्रोत ठरला. संगीत ही एक वैश्विक भाषा आहे. पंडितजींच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त सद्य-कालानुरूप पंडितजींना आमच्या तंत्रज्ञांनी वाहिलेली ही एक प्रामाणिक डिजिटल-सांस्कृतिक श्रद्धांजली आहे.”
- सुनील खांडबहाले, संगणकतज्ज्ञ