महिलांच्या आरोग्यासाठी काम करणारा ‘पिरिअड मॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:39+5:302021-05-28T04:08:39+5:30
(ऋषिकेश काशिद) मेखळी : भारतात मासिक पाळीविषयी मोकळेपणाने बोलायला आता कुठे सुरुवात होत आहे. कित्येक वर्षं 'विटाळ' मानला ...
(ऋषिकेश काशिद)
मेखळी : भारतात मासिक पाळीविषयी मोकळेपणाने बोलायला आता कुठे सुरुवात होत आहे. कित्येक वर्षं 'विटाळ' मानला गेलेला हा विषय पुरुष तर टाळतातच. या पार्श्वभूमीवर महिलांच्या आरोग्यासाठी काम करीत ‘पिरिअड मॅन’ म्हणून प्रवीण निकम यांनी ओळख निर्माण केली आहे. बारामती जवळील फलटण तालुक्यातील आसू येथील ते रहिवासी असून पिंपरी- चिंचवडमध्ये सध्या वास्तव्यास आहेत. महिलांच्या मासिक पाळीबाबत त्यांनी देशात घेतलेल्या कार्याची दखल इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ यांनी घेतली आहे. काही वर्षांपूर्वी प्रवीण यांना विशेष निमंत्रण पाठवून भेटण्यासाठी बोलावत त्यांचा सन्मान केला.
ते सध्या 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' याठिकाणी शिक्षण घेत आहेत. प्रवीण हे आसामचा अभ्यास दौरा करत असताना १७-१८ वर्षे वयाची रोशनी नावाची मुलगी साडी विणत होती. तिला शाळेत न जाण्याचे कारण विचारल्यावर समजलं की देवाने दिलेल्या शिक्षेमुळे म्हणजेच मासिक पाळीमुळे ती शाळेत जात नाही. तो प्रसंग ऐकून प्रवीण यांना वाटले की मासिक पाळीबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धा आणि गैरसमज याबद्दल आपल्याला काय करता येईल का? त्यानंतर २०११ पासून त्यांनी 'रोशनी फाउंडेशन'च्या माध्यमातून काम सुरू केलं.
एक तरुण मुलगा पाळीविषयी बोलतो याला समाजातून संमती मिळणं तसं अवघडच होतं. सुरुवातीला त्यांना विरोध झाला, परंतु नंतर ते बोलायला लागले तसा प्रतिसादही मिळायला लागला. सुरुवातीला लहान मुलांसाठी शाळांमध्ये जाऊन छोटे सेमीनार घेऊन आपल्या शरीरात होत असलेले बदल का आणि कसे होतात, त्यांच्याशी कसा सामना करायचा याविषयी ते बोलू लागले. लोकांशी संवाद साधण्यासाठी गटचर्चा, पथनाट्य, युवक शिबिरांच्या माध्यमातून संवाद साधत साधत त्यांनी या कामाला आणखी मोठं स्वरूप दिले आहे. त्यांच्या कार्याची घेऊन त्यांना एन्व्हायर्मेंटल ऑफ फोरमच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी वसुंधरा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
मासिक पाळीत वापरल्या जाणाऱ्या पॅडवर जीएसटी नको, ही भूमिका घेऊन प्रवीण यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून सॅनिटरी पॅड जीएसटी मधून करमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. चारचौघात खुलेपणाने न बोलल्या गेलेल्या या विषयावर वाहिन्यांवर चर्चा होऊ लागल्या आहेत, ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. आता पुरुषांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी घरातील मुली-महिलांना समजून घेऊन स्वातंत्र्य दिल्यास मोठा बदल घडू शकेल, असे मत प्रवीण यांनी लंडनहून ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
————————————————
संग्रहित फोटो : इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ यांच्याशी चर्चा करताना प्रवीण निकम.
२७०५२०२१-बारामती-१३
————————————————
फोटो : प्रवीण निकम
२७०५२०२१-बारामती-१४