'एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला, अन्यथा परिषद झाल्यास आम्ही उधळून लावू'; भाजपाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 06:23 PM2021-02-04T18:23:45+5:302021-02-04T18:23:52+5:30
एल्गार परिषदेच्या आयोजनावर बंदी घालावी अशी तसंच परिषद झाली तर आम्ही की उधळुन लावु अशी भुमिका आता भाजप युवा मोर्चाने केली आहे.
- नेहा सराफ
पुण्यात नुकतीच पार पडलेली एल्गार परिषद पुन्हा एकदा वादात सापडली आहे. एल्गार परिषदेच्या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानीवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता भाजपने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. आता गुन्हा दाखल झाल्यावरही भाजपने या मुद्द्यावर आपली आक्रमकता कायम ठेवत एल्गार परिषदेवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली आहे.
हिंदू धर्माबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक नेत्यांनीही पुढाकार घेतला. या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी याकरिता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेटही घेतली होती. पण यापुढे एल्गार परिषदेच्या आयोजनावर बंदी घालावी अशी तसंच परिषद झाली तर आम्ही की उधळुन लावु अशी भुमिका आता भाजप युवा मोर्चाने केली आहे.
भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी कालच पुण्याच्या पोलिस आयुक्तांना भेटलेले असताना आता युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी पुन्हा त्यासाठीचे निवेदन विश्रामबाग , फरासखाना आणि खडक पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे. यानंतर भाजप युवा मोर्चातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणण्यात आले आहे की, ' संस्कृतीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याची शांतता भंग करणे , पुण्यामध्ये धार्मिक , सामाजिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या एल्गार परिषदेचा खरा चेहरा शरजिल उस्मानीच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. एल्गार परिषदेवर बंदी घालावी आणि भविष्यात पुणे शहरा मध्ये एल्गार परिषदेला कार्यक्रमाला परवानगी देऊ नये'.