‘स्थायी’ला खर्चाची घाई!
By admin | Published: November 22, 2014 12:30 AM2014-11-22T00:30:09+5:302014-11-22T00:30:09+5:30
पुणेकरांनी विकासकामांसाठी कररूपाने जमा केलेल्या पैशाचे विश्वस्त म्हणून पालिकेच्या स्थायी समितीकडे पाहिले जाते.
सुनील राऊत, पुणे
पुणेकरांनी विकासकामांसाठी कररूपाने जमा केलेल्या पैशाचे विश्वस्त म्हणून पालिकेच्या स्थायी समितीकडे पाहिले जाते. मात्र, समितीकडूनच उधळपट्टी करण्यावर भर दिला जात असल्याचे गेले कित्येक दिवस निदर्शनास येत आहे. यासंदर्भात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरातील नागरिकांना सावित्रीबाई फुले विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाच्या धर्तीवर सुसज्ज असे शहर ग्रंथालय उभारण्याच्या तब्बल ७३ लाखांच्या नवीन कामास समितीने दोन आठवड्यांपूर्वी मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही स्थायी समिती आहे, की निधीच्या खर्चाची घाई असणारी समिती आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाच्या धर्तीवर पुणेकरांसाठी सुसज्ज ग्रंथालय, करिअर मार्गदर्शन सेंटर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नव्याने सुरू करण्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही लायब्ररी विद्यापीठाच्या परिसरात करण्यात येणार होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून जागा देण्यास टाळाटाळ होत असल्याने प्रकल्पाची घाई झालेल्या प्रशासनाने तातडीने निविदा प्रक्रिया राबवून या कामाचा खर्चही मागवून घेतला. महापालिकेकडे लायब्ररीसाठी प्रशस्त जागा नसल्याचे कारण पुढे करीत घोले रस्ता येथील कलादालनाचा इमारतीचा एक मजला वाढवून ही लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. तसेच पालिकेकडे त्यासाठी जागा नसल्याचे कारणही स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी पुढे केले. (प्रतिनिधी)