स्थायीची सदस्यनिवृत्ती ३० जानेवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:39 AM2018-01-17T05:39:01+5:302018-01-17T05:39:04+5:30
महापालिका स्थायी समितीचे आठ सदस्य ३० जानेवारीला निवृत्त होतील. कोण निवृत्त होणार ते समितीच्या सभेत चिठ्ठी काढून ठरवले जाईल.
पुणे : महापालिका स्थायी समितीचे आठ सदस्य ३० जानेवारीला निवृत्त होतील. कोण निवृत्त होणार ते समितीच्या सभेत चिठ्ठी काढून ठरवले जाईल. नव्या सदस्यांची नियुक्ती त्यानंतर फेब्रुवारीत होणाºया सर्वसाधारण सभेत होईल. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी चुरस असल्यामुळे समितीचे सदस्य होण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी आठ सदस्य दरवर्षी निवृत्त होतात. पहिल्या वर्षी त्यांची नावे चिठ्ठी काढून ठरवली जातात. स्थायी समितीच्या ३० जानेवारीला होणाºया सभेत चिठ्ठी काढून निवृत्त सदस्यांची नावे निश्चित केली जातील. ज्या पक्षांचे जेवढे सदस्य निवृत्त होतील त्या जागेवर त्याच पक्षाचे तेवढे सदस्य नव्याने नियुक्त केले जातील. पक्षनेत्याने सर्वसाधारण सभेत ही नावे महापौरांकडे द्यायची असतात. ही सर्वसाधारण सभा फेब्रुवारीत होईल. सध्या समितीत भाजपाचे ११ सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन व काँग्रेस, शिवसेना यांचा प्रत्येकी एक असे १६ सदस्य आहेत.
समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकाल अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे त्यांना दोन वेळा महापालिकेचा अर्थसंकल्प मांडता येणार आहे. त्यानंतर ते पदावरून पायऊतार होतील. त्यांनाच मुदतवाढ द्यावी, असाही एक मतप्रवाह पक्षात आहे. तसे झाले तर महापालिकेत प्रथमच स्थायी समितीच्या अध्यक्षाला सलग दुसºयांदा संधी दिली, असे होईल. पक्षात या पदासाठी सुरू झालेली रेस लक्षात घेता पक्षश्रेष्ठींकडून असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे. मात्र अध्यक्ष होण्यासाठी सत्ताधारी भाजपात बरेच जण बाशिंग बांधून बसले आहेत. त्याआधी सदस्य होणे गरजेचे असल्यामुळे त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
सुनील कांबळे, हेमंत रासने
तसेच राजेंद्र शिळीमकर यासाठी इच्छुक आहेत. यापैकी शिळीमकर मागील पंचवार्षिकमध्ये स्थायी समितीचे सदस्य होते. त्यामुळे रासने व कांबळे यांच्यात चुरस होण्याची शक्यता आहे.