Uday Samant: कायमस्वरूपी ऑनलाईन परीक्षा हा तर गैरसमज; आता ऑफलाईन घेण्याची सरकारची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 05:08 PM2021-12-13T17:08:33+5:302021-12-13T18:36:00+5:30
कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. हळूहळू आपण ऑफलाईन परीक्षांकडेच आले पाहिजे, हीच महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे कायम स्वरूपी आपण ऑनलाईन परीक्षा घेणार आहोत, असा गैरसमज कोणी करून घेतला असेल तर तो साफ चूकीचा आहे
पुणे : राज्य शासनाने कधीही ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना जास्त गुण द्यावेत अशी भूमिका घेतली नाही. कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. हळूहळू आपण ऑफलाईन परीक्षांकडेच आले पाहिजे, हीच महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे कायम स्वरूपी आपण ऑनलाईन परीक्षा घेणार आहोत, असा गैरसमज कोणी करून घेतला असेल तर तो साफ चूकीचा आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 119 पदवी प्रदान समारंभानंतर सामंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी परीक्षांबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यात कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घ्याव्यात, असा मार्ग सुचवण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख्य म्हणून एकूण परिस्थितीचा विचार करून परीक्षांबाबत निर्णय घ्यावा, अशा स्पष्ट सूचना शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन - ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयात धरसोड झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा उद्रेक होऊ नये, याचीही विद्यापीठांनी काळजी घ्यायला हवी.
आरोग्य विभाग व म्हाडाच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांकडून सर्व परीक्षा पारदर्शकतेने घेतल्या जाव्यात, अशी मागणी केली जात आहे. केवळ विद्यार्थ्यांचीच नाही तर राज्य शासनाची सुध्दा तशीच भूमिका असून त्या-त्या विभागाचे मंत्री परीक्षा सक्षम घेण्याबाबत आवश्यक उपाययोजना करत आहेत, असेही सामंत यांनी नमूद केले.
वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर ...
राज्यात विद्यापीठे व महाविद्यालये सुरू झाली आहेत. परंतु, अद्याप वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही वस्तीगृहात राहण्यास परवानगी मिळत नाही, हे खरे असले तरी सध्या ‘ओमायक्रॉन’ मुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तर क्वारंटाईन सेंटर साठी वसतीगृह उपलब्ध होण्यास अडचणी येतील. त्यामुळे विचारपूर्वक वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असे सामंत म्हणाले.
लेखी तक्रारीनंतरच संबंधित महाविद्यालयांवर कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी किती व कोणत्या गोष्टींसाठी शुल्क आकारावे, अशा स्पष्ट उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. मात्र, तरीही काही महाविद्यालयांकडून नियमबाह्य व बेकायदेशीरपणे शुल्क आकारून विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात असेल तर संबंधित विद्यार्थी व पालकांनी त्याची लेखी तक्रार तंत्र शिक्षण सहसंचालक किंवा उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे करावी. त्यानुसार चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल,असेही सामंत यांनी स्पष्ट केले.