मेट्रोच्या ‘स्वारगेट ते कात्रज’ मार्गाचा डीपीआर करण्यास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:26 PM2018-05-16T13:26:51+5:302018-05-16T13:26:51+5:30
पुणेकर नागरिक,पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग कात्रजपर्यंत वाढविण्याची मागणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या सभेत घेण्यात आला.
पुणे: मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या वाढीव मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपोर्रेशनला ७६.२८ लाख रुपयांचा निधी व १२ टक्के जीएसटीचे अधिकची रक्कम देण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली. पुणेकर नागरिक,पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून झालेली मागणी व स्थायी समितीमध्ये वारंवार झालेल्या चर्चेनुसार व मागणीनुसार पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ही मेट्रो मार्ग कात्रज पर्यंत वाढविण्याची मागणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या सभेत घेण्यात आला. त्यामुसार या वाढीव मार्गाचा डीपीआर करण्यासाठी महामेट्रोला लेखी पत्र पाठवून कळविण्यात आले. यासाठी येणार खर्च महापालिकेच्या वतीने करण्यात येईल, असे ही कळविण्यात आले. त्यानुसार महामेट्रोच्या वतीने डीपीआरचे काम सुरु देखील केले असून, यासाठी आवश्यक असलेला निधी देण्यास मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकामध्ये पुणे मेट्रो साठी ८ कोटी ७३ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. या तरतुदीमधूनच हा खर्च करण्यात येणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले. शासनाने स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत मेट्रो मार्गास यापूर्वीच तत्वत: मान्यता दिली आहे. या विस्तारीत मेट्रो मार्गिकेचा दुस-या टप्प्यात समावेश करून त्याचा स्वतंत्रपणे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली आहे.