ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 08:56 PM2020-12-29T20:56:10+5:302020-12-29T20:56:57+5:30
जात पडताळणीचा अर्ज देखील ऑफलाईन चालणार
पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उडालेला गोंधळ, नेटवर्कची समस्या आणि इंटरनेटचे स्पीड यामुळे अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन अखेरच्या क्षणी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईनसह ऑफ लाईन देखील अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार (दि.30) अखेरची मुदत असून, इच्छुक उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
यंदा राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ ऑनलाईन पध्दतीने चे उमेदवारी अर्ज स्वीकारणे बंधनकारक केले. परंतू उमेदवारी अर्ज भरण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाची असलेली पंचायत इलेक्शन ही वेबसाईट अत्यंत स्लो काम करत असल्याने तसेच ग्रामीण भागात पुरेसे इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आता रात्रपाळी करावी लागली. तर दुसरीकडे जात पडताळणी करता कराव्या लागणाऱ्या अर्जासाठी ची वेबसाईट देखील अडखळत असल्याने आणि उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येत नसल्याने उडालेला गोंधळ लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी या दोन्ही प्रक्रिया ऑनलाइन बरोबरच ऑफलाइन देखील करण्यास परवानगी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर पुरेसे स्पीड मिळत नसल्याने एक अर्ज भरण्यासाठी तीन-चार तासांचा वेळ लागत होता. उमेदवारांना रात्रभर नेट कॅफे, महा ई सेवा केंद्रांमध्ये थांबावे लागत असून , काही उमेदवार दोन दोन दिवस प्रयत्न करूनही त्यांचे अर्ज भरले जात नव्हते.
राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते किंवा जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पोहोच पावती जोडणे बंधनकारक आहे , अन्यथा हे उमेदवार निवडणुकीत अपात्र ठरतात जात पडताळणीसाठी ऑनलाईन पद्धतीने बार्टी कडे अर्ज करावा लागतो त्यासाठीची वेबसाईट देखील अत्यंत धिम्या गतीने काम करत असल्याने उमेदवारांची अडचण झाली . त्यामुळे सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रक्रिया ऑनलाइन अर्ज भरताना प्रचंड गोंधळ उडाला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी आयोगाने ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली.
------
जिल्हा परिषद उपाध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सर्व्हर ऑफलाईन जात असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ होत आहे,तसेच ऑनलाईन प्रक्रिया किचकट असल्याने अनेक इच्छुक अर्ज भरता आला नाही अशी लेखी तक्रार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार देशमुख यांना केली आहे. तरी निवडणूक अर्ज ऑफलाईन स्वरूपात घेण्यात यावेत,अन्यथा अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, असे देखील शिवतरे यांनी म्हटले.