Shivjayanti 2022: बारामतीत नियमांचे पालन करून शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 01:22 PM2022-03-20T13:22:52+5:302022-03-20T13:23:10+5:30
बारामती : नियमांचे पालन करून शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. ...
बारामती : नियमांचे पालन करून शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. अनेक मंडळ आणि लोकांकडून पोलीस स्टेशनला शिवजयंतीच्या मिरवणुकीबाबत विचारणा होत आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यंदा नियमांचे पालन करून मिरवणुकीस परवानगी देणार आहे. या मिरवणुकीमध्ये कोणत्याही ‘डीजे’ला परवानगी देण्यात येणार नाही, मंडळापुढेसुद्धा देण्यात येणार नाही. केवळ पारंपरिक वाद्य या ठिकाणी वाजवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. ध्वनी प्रदूषण कायदा २००० प्रमाणे शहरी भागामध्ये ७५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाची तीव्रता गेल्यास ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन होते. त्यामुळे मोठा आवाज व दणदणाट याला कोणत्याही प्रकारची परवानगी असणार नाही. याचे कोणी उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
यासाठी शहर पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांचे डेसिबल रिडिंग घेण्यासाठी पथक नियुक्त करण्यात येणार आहे. या कायद्याप्रमाणे डॉल्बीधारकांवर व मंडळावर लाखो रुपयांचा दंड कोर्टामध्ये होऊ शकतो. त्यामुळे मंडळांनी स्पीकर परवाना दिल्यानंतर ध्वनिप्रदूषण होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देऊन नियंत्रित आवाजामध्ये आपला जयंती उत्सव साजरा करायचा आहे. शिवजयंतीच्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत मिरवणुकीला परवानगी असणार आहे .त्यानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक निघू दिली जाणार नाही.
सर्वांनी नियमात राहून शिवजयंती साजरी केल्यास पोलिसांचे सर्व सहकार्य असणार आहे. बंदोबस्तासाठी एकूण दहा अधिकारी व १०० लोकांचा स्टाफ या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महाडिक यांनी सांगितले.