मंडपांना मिळणार नेहमीप्रमाणेच परवानगी

By admin | Published: September 6, 2015 03:36 AM2015-09-06T03:36:36+5:302015-09-06T03:36:36+5:30

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महापालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाचे धोरण ठरवत आहे. १८ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत या धोरणाला मान्यता घेण्यात येईल व नंतरच ते अधिकृत होईल.

Permission is granted to the Pavilion as usual | मंडपांना मिळणार नेहमीप्रमाणेच परवानगी

मंडपांना मिळणार नेहमीप्रमाणेच परवानगी

Next

पुणे : न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महापालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाचे धोरण ठरवत आहे. १८ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत या धोरणाला मान्यता घेण्यात येईल व नंतरच ते अधिकृत होईल. त्यामुळे १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मंडपांना नेहमीप्रमाणेच परवानगी दिली जाणार आहे.
महापौर दत्तात्रय धनकवडे यांनीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही माहिती दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका कार्यालयात आज दुपारी ही बैठक झाली. त्यात अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस त्यांना मंडप परवानगी व अन्य कारणांसाठी त्रास देत असल्याच्या तक्रारी केल्या. बैठकीला कोणीही वरिष्ठ किंवा कनिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित नव्हते. नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कसबा पेठ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळांकडून वीज कंपनी अनामत रक्कम स्वीकारते, उत्सव संपल्यानंतर त्यांनी ही रक्कम त्वरित मंडळांना द्यायला हवी, प्रत्यक्षात ते त्यासाठी बराच उशीर लावतात असे सांगितले. त्यांना ही रक्कम कायमची ठेवून घेऊन मंडळांना दरवर्षी वीजजोड देण्याचे आदेश द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली.
दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी पुण्याच्या गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून, त्यासाठी महापालिकेने सहकार्य करावे, असे आवाहन केले. उत्सवकाळात नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी मोबाईल टॉयलेट्स सुरू करावेत तसेच पोलिसांकडून रस्त्याच्या कडेला थांबणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर उत्सवकाळात कारवाई होऊ नये यासाठी त्यांना आदेश द्यावेत, अशी मागणीही सूर्यवंशी यांनी केली. गोपाळ तिवारी यांनी यंदाचा दुष्काळ लक्षात घेऊन जी मंडळे पाणी बचतीचे देखावे सादर करतील त्यांना महापालिकेच्या देखावा स्पर्धेत प्राधान्य द्यावे असे सुचवले.
सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर महापौर धनकवडे यांनी महापालिका मंडपाबाबत ठरवत असलेल्या धोरणाची माहिती दिली. न्यायालयाचा आदेश आहे, त्याप्रमाणे महापालिका कार्यवाही करीत आहे, ते ठरेपर्यंत मंडपांना परवानगीसाठी अडचण येणार नाही. परवानगीसाठी महापालिकेत एक खिडकी योजना सुरू करू तसेच पोलिसांनीही त्यांच्या अखत्यारीतील परवानगीसाठी मंडळाची अडचण करू नये याबाबत त्यांना विनंती करू असे त्यांनी सांगितले. मंडळांनी स्वच्छता, पाणी बचत, पर्यावरण अशा प्रकारच्या सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापौरांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Permission is granted to the Pavilion as usual

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.