माजी सैनिकांच्या जागेवर बिल्डरांशी संगनमत करून प्रकल्पाला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:44+5:302021-09-13T04:09:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माजी सैनिकांच्या जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना भूमी अभिलेखा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माजी सैनिकांच्या जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना भूमी अभिलेखा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी करून दिली, तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी त्यावर मंत्रा २९ गोल्ड कास्ट या प्रकल्पाचा प्लॅन पास करून दिल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी बांधकाम व्यवसायिकासह महापालिका अधिकारी व भूमी अभिलेखा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी माजी सैनिक राजेंद्र सिंग यांचे कुलमुखत्यारधारक विशाल सत्यवान खंडागळे (वय ३५, रा. रामवाडी, नगर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून रोहित घनश्याम गुप्ता (वय ६०), मुकेश घनश्याम गुप्ता (वय ५५), किशोर पोपटलाल गाडा (वय ४५), नीलेश पोपटलाल गाडा (वय ४०, सर्व रा. मेट्रोपोल, बंडगार्डन रोड) तसेच, पुणे महानगरपालिका व भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ ऑगस्ट २००९ ते ४ मे २०२१ दरम्यान घडला आहे.
खंडागळे यांनी खडकी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश दिला. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी गन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलमुखत्यारधारक खंडागळे यांची धानोरी येथील मुंजाबा वस्तीमधील वहिवाटीची सर्व्हे नं. २९ मधील एकूण क्षेत्र १५ हजार १०० स्क्वेअर मीटरपैकी प्लॉट नं. १६, २० आणि २१ क्षेत्र, ९ आर (गुंठे) या जागेची मंत्रा २९ गोल्ड कोस्ट डेव्हलपर्स एलएलपीचे भागीदार गुप्ता व इतरांनी येरवडा येथील भूमी अभिलेख कार्यालयात खोटी माहिती देऊन सर्व्हे नं. २९ ची मोजणी करून घेतली. या मिळकतीवर सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असतानाही पुणे महानगरपालिका व भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय, हवेली येथील अधिकाऱ्र्याशी संगनमत करून मंत्रा २९ गोल्ड कोस्ट हा प्रकल्प मंजूर करून घेतला. फिर्यादी यांची सर्व्हे नं. २९ मधील १५ हजार ९०० स्क्वेअर मीटरपैकी प्लॉट नं. १६, २० आणि २१ क्षेत्र ९ आर (गुंठे) धानोरी येथील जागा त्यांची आहे, असे भासवून ती बळकावून फसवणूक केली असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक सातपुते अधिक तपास करीत आहेत.