पुणे महापालिका क्षेत्रातील व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी : आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 09:29 PM2020-10-24T21:29:46+5:302020-10-24T21:30:14+5:30
हॉटेल्स, बार रात्री साडेअकरापर्यंत राहणार खुले..
पुणे : शासनाच्या निर्देशांचे पालन करीत महापालिकेनेही टाळेबंदी उठवित दुकाने, हॉटेल्स, ग्रंथालये, विपश्यना केंद्राना परवानगी दिली आहे. पालिकेने शनिवारी आदेश काढत प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले.
या आदेशानुसार २५ ऑक्टोबरपासून व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत. अनेक हॉटेल चालकांनी हॉटेल्सची वेळ रात्री ११ पर्यन्त वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, महापालिका क्षेत्रामधील प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार हे ५० टक्के क्षमतेनुसार सकाळी आठ ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यापूर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेले सर्व उपक्रम त्याकरिता निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार नियमांचे पालन केले जावे. त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
------
नागरिक घरांमधून उशिरा बाहेर पडून हॉटेलमध्ये जेवायला जातात. त्यांना वेळ पुरत नाही. ग्राहक येण्याच्या वेळेतच हॉटेल्स बंद करावी लागत असल्याने हॉटेल चालकांनी मुंबईच्या धर्तीवर वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्याला पालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.