पुण्यातील तरुणाची जिद्द! कोरोनाच्या संचारबंदीत हमाली करून सांभाळले कुटुंब
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 04:10 PM2021-06-02T16:10:29+5:302021-06-02T16:50:34+5:30
तुळशीबागेत चालवतो टॉवेल, रुमाल यांचा स्टॉल
पुणे: कोरोनाच्या काळात बेरोजगार झालेले तरुण, व्यवसाय डुबलेल्या अनेक व्यक्ती नैराश्यात जात होत्या. काही जण तर स्वतःच्या कुटुंबाचा विचारही न करता आत्महत्येचा मार्ग निवडू लागले होते. अशा कठीण काळात दोन महिने स्वतःचे दुकान बंद असल्याने हमालीचे काम करत कुटुंबाचा सांभाळ केला आहे. सगळं थांबल असतानाही शुभम गोरे याने धैर्य आणि जिद्दीने हे करून दाखवले आहे . पुण्यातील तुळशीबागेत शुभम गोरे याचा टॉवेल, नॅपकिन, हातरुमाल छोटा स्टॉल आहे.
पुण्यात तुळशीबाग मध्यवर्ती भागात येते. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी होत असते. ही चालू ठेवणे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे असते. कोव्हिडंच्या काळात येथील दुकाने वर्षभर बंद केली होती. काही महिने दुकानांना चालू करण्यास परवानगी देण्यात आली. पण पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाने बंदी आणली. त्यामुळे येथील अनेक छोटे मोठे व्यापारी आणि व्यवसायिकांना आर्थिक चणचण भासू लागली. दुसरा कुठला व्यवसाय करावा असा प्रश्नही सर्वांसमोर उभा होता. शुभमलाही त्याची चिंता वाटू लागली होती. पण या कठीण काळात त्याने हार न मानता दुसरे काम शोधण्यास सुरुवात केली.
शुभम म्हणाला, दोन महिन्यापूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात तुळशीबाग हे गर्दीचे ठिकाण असल्याने ते पहिल्यांदा बंद करण्यात आले. अशा वेळी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच होती. माझ्या छोट्या स्टॉल वर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. म्हणून मी दुसऱ्या कामाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
या परिस्थितीत मार्केटयार्ड चालू होते. मी मध्यरात्री अडीच, तीनच्या सुमारास तेथे जात असे. सकाळी सात वाजेपर्यंत हमालीचे काम करत होतो. त्यानंतर मिळालेल्या पैशातून टेम्पो भाडयाने घेत होतो. त्यामधून भाजी फळे घेऊन शहरात विक्रीसाठी येत असे. अशा प्रकारे दररोज काम करू लागलो.
घरातली आई, वडील, दोन लहान भाऊ आणि आजी आजोबा यांची जबाबदारी माझ्यावर होती. वडिलांना दमा असल्याने ते शक्यतो अशा परिस्थितीत बाहेर पडत नव्हते. तो दोन महिन्याचा काळ खूपच वाईट गेला. पण काम करून आर्थिक चणचण दूर केली असल्याचे त्याने सांगितले.
संकटात कधीही घाबरून अथवा नैराश्यात जाऊ नका
कोरोना काळात एक नवी शिकवण मिळाली. की एकाच व्यवसायावर कधीही अवलंबून राहू नये. तसेच कठीण काळात कोणतेही काम करण्याची तयारी ठेवावी. नेहमी आपल्या कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवून हार न मानता जिद्दीने नव्या कामाला सुरुवात करावी. असेही त्याने यावेळी सांगितले आहे.