देखभालीसाठी ठेवलेल्या नोकरानेच घातला ज्येष्ठ नागरिक महिलेला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 08:31 PM2019-11-27T20:31:06+5:302019-11-27T20:33:19+5:30
७२ वर्षांच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात दिली फिर्याद..
पुणे : देखभालीसाठी ठेवलेल्या दोन नोकरांनी संगनमत करुन डेबिट आणि क्रेडिट कार्डचा गोपनीय नंबर मिळवून ज्येष्ठ नागरिक असलेल्या पती-पत्नीला पावणेदोन लाखांना गंडा घातला आहे़. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एका नोकराला अटक केली आहे़.
मिथुन बाळासाहेब जगताप याला अटक करण्यात आली असून संदीप भगवान हांडे (वय २५, रा़ पिंपरखेडा, गंगापूर, टेंभापुरी, औरंगाबाद) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे़. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे़ या प्रकरणी बाणेर रोडवरील सिंध सोसायटीतील ७२ वर्षांच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे़. ही घटना २५ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर २०१९ दरम्यान घडली.
या बाबत पोलिसांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिक पती-पत्नी सिंध हौसिंग सोसायटीत राहतात़ त्यांची मुलगी मुंबईत रहात असून तिने त्यांच्या देखभालीसाठी दापोडी येथील नर्सिग ब्युरोतून संदीप हांडे याला दोन महिन्यांपूर्वीै त्यांच्या पतीची देखभाल करण्यासाठी ठेवले होते़. तो घरातील कामे व कारही चालवत असे़. त्यांच्या पर्समध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँकेचे डेबिट व सिटी बँकेचे क्रेडिट कार्ड ठेवलेले असे़. त्यांची पर्स घरातच टेबलावर त्या ठेवत़ त्यांना मोबाईल आले तरी ते ब्युरोचे लोक रिसिव्ह करुन त्यांच्याकडे देत़. संदीप हांडे याने १८ नोव्हेंबरला आपल्याला गावाला जायचे आहे़. माझ्या जागी दुसरा मिथुन जगताप येईल असे सांगितले़. तो गावाला गेल्यानंतर मिथुन जगताप घरात काम करीत असत़ २४ नोव्हेंबरला त्यांच्या नातूचा ई मेल आल्याने त्यांनी लॅपटॉपवर मेल चेक करीत होत्या़. त्यावेळी त्यांना सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन पेटीएम ला २९ क्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ६ व्यवहार झालेले दिसले़.त्यांनी मुलीला फोन करुन ही माहिती सांगितली़.पुण्यात येऊन तिने चौकशी केल्यावर दोघांच्या कार्डवरुन सिटी बँकेतून १७ व्यवहार, बँक ऑफ महाराष्ट्रच्या डेबिट कार्डमधून पेटीएम ला १० व्यवहार मिळून ४९ हजार १०० रुपये ट्रॉन्सफर झाले़.एचडीएफसी बँकेतील कार्डवरुन ९ व्यवहारातून ४३ हजार ५०० रुपये ट्रॉन्सफर झालेले दिसून आले़.अशा प्रकारे त्यांनी तीन कार्डावरुन १ लाख ८७ हजार ७०० रुपये ट्रॉन्सफर केल्याचे आढळून आले़.त्यांनी नर्सिग ब्युरोतील लोकांनीच हा प्रकार केल्याचा संशय आल्याने त्यांनी नर्सिंग ब्युरोला ही माहिती दिली़.त्यांचे व्यवस्थापक रितेश शिंदे यांनी चौकशीसाठी मिथुन जगताप याचा मोबाईल घेतला़.त्याच्या बॅगा तपासल्या़.तेव्हा बॅगेत त्यांची सोन्याची अंगठी सापडली़.तसेच सिटी बँकेचे बँक स्टेटमेंट सापडले़.त्यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली़. पोलिसांनी चौकशी केल्यावर मिथुन याने सांगितले की, संदीप हांडे याच्यावर त्याची दोन महिन्यापासून ओळख आहे़.बदली कामगार म्हणून त्याने नेमले होते़.त्याने मिथुनला या महिलेच्या मोबाईलवर आलेले ओटीपी मला सांग असे सांगितले़.त्याप्रमाणे त्याने आलेले ओटीपीनंबर चार वेळा सांगितले होते़.
चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन मिथुन जगताप याला अटक केली आहे़.संदीप हांडे याला अटक करण्यासाठी पथक रवाना झाले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले़