परखड अभिव्यक्ती हेच ‘पुरुषोत्तम’चे यश
By admin | Published: December 26, 2016 03:54 AM2016-12-26T03:54:28+5:302016-12-26T03:54:28+5:30
पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानदंड प्रस्थापित करणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये विविध महाविद्यालयांच्या संघांनी आपले कलात्मक कौशल्य सिद्ध केले.
नम्रता फडणीस/ पुणे
पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानदंड प्रस्थापित करणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये विविध महाविद्यालयांच्या संघांनी आपले कलात्मक कौशल्य सिद्ध केले. ‘जिंकणे किंवा हारणे’ या हेतूच्या पलीकडे जाऊन पुरुषोत्तम करंडक स्पर्धा अभिव्यक्तीचा एक खुला रंगमंच म्हणून समोर येत आहे. महाअंतिम फेरीचे परीक्षक म्हणून मोलाची कामगिरी बजावलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शक किरण यज्ञोपवीतदेखील हेच निरीक्षण नोंदवितात. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून ‘तरुणाई कोणताही अभिनिवेश न ठेवता विषयांबाबतचे आकलन, विचार आणि सशक्त मांडणीतून परखडपणे अभिव्यक्त होत आहे, हेच या स्पर्धेचे यश आहे’ असे ते आवर्जून सांगतात.
* गेल्या ५० वर्षांत पुरुषोत्तम स्पर्धेमध्ये झालेल्या बदलाविषयी काय सांगाल?
- सुरुवातीपासूनच पुरुषोत्तमने एक ’पॅरामीटर सेट’ केला. स्पर्धेत अमूक एक प्रकारची एकांकिका अशा पद्धतीने सादर केली तर ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकेल किंवा हमखास पारितोषिकासाठी प्राप्त ठरेल हेच सादरीकरणाचे मोजमाप ठरलेले असायचे, ही मानसिकता आजही काही प्रमाणात कायम असल्याचे दिसले. त्यामुळे यंदा स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये तीस ते चाळीस वर्षांपूर्वी सादर झालेल्या ‘मैत’ किंवा ‘सांबरी’ या एकांकिका संघांकडून सादर झाल्या. कौतुकाचे आकर्षण असल्याने जुन्या विषयांना प्राधान्य दिले गेले.
* संघाच्या सादरीकरणांमध्ये काय वेगळेपणा जाणवला?
- काही संघांनी खूप छान विषय निवडले. त्यात अभिनयातील सशक्तता हा एक निकष ठेवून काही व्यक्तिरेखा विशिष्ट व्यक्तींसाठी निर्माण केल्या गेल्या. एका संघाने सेलिबल पायरसी विषयावर खूप सुंदरपणे मांडणी केली, त्या विषयाच्या सादरीकरणामागचा दृष्टिकोन खरच खूप वेगळा होता. ते अशाच पद्धतीने सादर करायचे असे काही ठरविण्यात आले नव्हते, मात्र विषयाचे भान ठेवून आकलनक्षमतेनुसार अत्यंत सच्चेपणाने या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले.
* सध्याच्या काळात तंत्र स्पर्धेवर हावी होत आहे असे वाटते का?
- तंत्र हा खूप व्यापक विषय आहे. ते केवळ एक साधन आहे. एखाद्या विषयाची मांडणी वेगळ्या पद्धतीने कशी करता येऊ शकते, त्याची पडताळणी करणारी ही एक यंत्रणा आहे. तंत्रामुळे तुमच्या विचारांना दिशाही मिळू शकते, काही प्रसंगांमध्ये त्याचा हुकमी वापरही करता येऊ शकतो. स्पर्धेमध्ये तंत्राचा वापर झालाही; पण आशय हरवला आहे असे वाटले नाही.
* एकांकिकांमध्ये प्रयोगमूलकतेला कितपत वाव असतो?
- आपल्याला जे मांडायचे आहे ते त्याच पद्धतीने मांडले गेले पाहिजे याचे एक खुले अंगण अशा एकांकिकांमधून मिळते. मला माझे म्हणणे योग्य पद्धतीने पोहोचविता येते का? याची चाचपणीही करता येते. ‘पाझर’ ही मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर सादर झालेली एकांकिका याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
* या स्पर्धांचे समाजातील स्थान काय?
- आपले म्हणणे मांडू शकणे, त्याची कदर होणे, नवीन विचारांना प्रवृत्त करणे, हेच या स्पर्धांचे प्रयोजन असते. जुन्याला भिरकावून नवीन विषयांची चाचपणी करणे, आपले विचार परखडपणे प्रस्तुत करणे हाच त्यामागचा हेतू आहे. सतीश आळेकर, विजय तेंडुलकर यांनी अशाच प्रकारे प्रस्थापित साचेबद्ध चौकटी ओलांडून नवीन विषयांची मांडणी केली.
* यापुढील टप्प्यात स्पर्धेच्या सादरीकरणाचा प्रवाह कशापद्धतीने खळखळत राहिला पाहिजे असे वाटते?
- जगभरात जे नाटक चालले आहे, त्यामधून जे वैचारिक मंथन होत आहे, त्याचे पडसाद या एकांकिकांमध्ये उमटायला हवेत.
* महाराष्ट्र कलोपासक या आयोजक संस्थेविषयी काय
सांगाल?
- ही संस्था अत्यंत तळमळीने इतकी वर्षे कोणतीही अपेक्षा न ठेवता स्पर्धा आयोजित करीत आहे त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. परीक्षकांना चांगले प्रॉडक्ट देऊ शकलो नाही याची खंत पदाधिकाऱ्यांना वाटणे यातच सर्वकाही आले. या स्पर्धेचा दर्जा अधिकाधिक वर जात राहाणार यात शंकाच नाही.