पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:38 AM2018-08-22T02:38:15+5:302018-08-22T02:38:49+5:30
राज्यात खरीप पिकांची १३२.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून भात, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
पुणे : राज्यात खरीप पिकांची १३२.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून भात, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून औषधांचा पुरवठा संथ गतीने होत असून, महामंडळाकडील प्रोफेनोफॉस या औषधाच्या तांत्रिक घटकाचा साठा संपला आहे. मात्र, कृषी विद्यापीठांनी शिफारस केल्यानुसार शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या कीटनाशकांसाठी ५० टक्के अनुदान दिले जात आहे, असे कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.
कृषी विभागातर्फे राज्याचा खरीप हंगामाचा १६ आॅगस्टपर्यंतचा पीकपेरणी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील पिकांवर पडलेल्या रोड व किडीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार, भातपिकावर खोडकिडा, पाने खाणारी अळी व गोदमाशी या किडीचा; तर करपा, कडाकरपा व तांबेरा या रोगांचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. मूग व उडीद पिकांवर मावा या किडीचा, सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, चक्री भुंगा व उंट अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव अढळून आला. कापूस पिकावर मावा, तुडतुडे, शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. कृषी विद्यापीठाकडून या सप्ताहात पीक संरक्षणाच्या दृष्टीने कापूस, सोयाबीन व भातपिकासाठी सल्ले दिले आहेत. तसेच, कीडरोग व्यवस्थापनासाठी राज्यातील शेतकºयांना १८ लाख ९८ हजार एसएमएस पाठविले आहेत. गुलाबी बोंडअळीचे पतंग पकडण्यासाठी राज्यात
एकूण २०४ गावांमध्ये क्षेत्रीय प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जात आहे. तसेच, बोंडअळी नियंत्रण व कीटकनाशकांसाठी ८०२.५० लाख रुपये निधीची तरतूद केली असून कीड व्यवस्थापनासाठी अतिरिक्त १६.९७ कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध होईल, असे कृषी अहवालात आहे.
गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान
राज्यात कापूस पिकाखालील २६ जिल्ह्यांत एकूण २० हजार १६० गावांमध्ये पेरणी झाली असून, त्यात आॅगस्ट महिन्याच्या तिसºया आठवड्यात ५ हजार ७६४ गावांमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानाच्या पातळीच्यावर दिसून आला.
तसेच, कापूस पिकावरील कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता एकूण १ लाख ९ हजार ६४४ लिटर औषधांची महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र, औषधांचा पुरवठा संथ गतीने होत आहे.
किडींचा धोका
पुणे विभागात भात,बाजरी पिके फुटवे फुटण्याच्या अवस्थेत, मका, सूर्यफूल, सोयाबीन व भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत; तर मूगपीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या व उडीदपीक वाढीच्या ते फुलोरा या अवस्थेत आहे.
विभागात काही ठिकाणी मूग व उडीद पिकांवर मावा किडीचा, सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी, चक्री भुंगा व मावा किडीचा तर कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.