पेस्ट कंट्रोल बेतले जीवावर, गुदमरून दाम्पत्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 09:02 AM2020-02-13T09:02:38+5:302020-02-13T09:02:58+5:30
पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात योग्य ती काळजी न घेतल्याने पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पुणे : पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात योग्य ती काळजी न घेतल्याने पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना बिबवेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी घडली. अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा मजली (वय 54) अशी मृतांची नावे आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजली कुटुंबाने दाम्पत्याने मंगळवारी (11 फेब्रुवारी) घरात पेस्ट कंट्रोल केले आणि खबरदारी म्हणून ते नातेवाईकांच्या घरी गेले होते. तो दिवस त्यांनी बाहेरच घालवला आणि सायंकाळी घरी परत आले. परंतु पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात आल्यावर त्यांनी हवा खेळती राहावी म्हणून घराची खिडक्या, दारे उघडली नाहीत. पंखा चालू न करता टीव्ही पाहात बसले. काही वेळाने तयार झालेल्या वायूने चक्कर येऊन दोघेही खाली पडले. त्यांच्या मुलीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यापूर्वीही पुण्यातीलच भारती विद्यापीठ आणि सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर काळजी घेतल्याने बीडवरून काम करण्यासाठी आलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पेस्ट कंट्रोल नंतर योग्य काळजी घेण्याची आवाहन पोलिसांनी केले आहे.