पाळीव प्राण्यांसाठी आता परवानगी लागणार ; नियमावली लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:21 PM2018-03-27T14:21:59+5:302018-03-27T14:21:59+5:30
प्राण्यांच्या स्वच्छतेबाबत, आवाजाबाबत, भुंकण्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी, पालिकेपासून थेट पोलीस ठाण्यापर्यंत जात आहे.
पुणे : शहरामध्ये कुत्रा, मांजर सारखे पाळीव प्राणी पाळणारे लाखो पुणेकर असून, त्यांना पाळीव प्राण्यांसाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. महापालिका हद्दीत रहिवाशी भागांमध्ये वैयक्तिकरित्या किती व कोणते पाळीव प्राणी पाळावेत याबाबत महापालिका स्वतंत्र धोरण तयार करत असून, यासाठी स्वतंत्र नियमावली करण्यात येणार आहे. याबाबत महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत स्वतंत्र ठराव मंजूर करण्यात आला आहे.
मेट्रो सिटी म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या पुणे शहरामध्ये पाळीव प्राण्याची प्रामुख्याने कुत्रा, मांजर सारखे प्राणी पाळणा-या पुणेकरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, शहरात अनेक प्रकारचे पाळीव प्राणी वैयक्तिकरीत्या पाळले जातात, याबाबत या प्राण्याचे पालनपोषण करताना नागरिकांनी किती प्राणी पाळावेत, याचे काहीही नियम सध्या अस्तित्वात नाहीत. गेल्या काही वर्षांत शहरात सर्वच भागांत वस्तीभाग, अपार्टमेंट, सोसायट्या, बंगले येथे एक-दोनपेक्षा अधिक पाळीव प्राणी असणारी लाखो कुटुंबे आहेत. परंतु, या प्राण्यांच्या स्वच्छतेबाबत, आवाजाबाबत, भुंकण्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी, पालिकेपासून थेट पोलीस ठाण्यापर्यंत जात आहे. या पाळीव प्राण्यांवरून शहरामध्ये काही सोसायट्यांत मोठे वाददेखील निर्माण झाले आहेत. गेल्या काही वर्षांत पाळीव प्राण्यांवरून मारहाण करण्याचे प्रकार देखील घडलेले आहेत. परंतु, याबाबत सध्या पुणे शहरात कोणत्याही प्रकारची नियमावली नसल्याने कारवाई करताना अडचणी येत असून, पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टींमुळे पुणे शहरात पाळीव प्राण्याबाबत नियमावली करण्याची मागणी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत या प्रस्तावावर चर्चा करून महापालिकेच्या रहिवासी भागांमध्ये वैयक्तिकरीत्या किती व कोणते प्राणी पाळावेत, याबाबात स्वतंत्र धोरण व नियमावली बनविण्यासाची कार्यवाही सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. .
अनेक देशांत बंधनकारक
सध्या अनेक देशांत पाळीव प्राण्यांबाबत विविध कायदे अस्तित्वात आहेत. तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्राणी पाळण्यावर संपूर्ण बंदीही घातली आहे. मांजर, कुत्रा पाळण्यासाठी कायदेशीर परवाना काढणेही कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुणे शहरामध्ये पाळीव प्राणी पाळण्यावर निर्बंध येणार असून, स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार आहे.