पेठांना मिळणार अडीच एफएसआय
By admin | Published: February 14, 2015 03:07 AM2015-02-14T03:07:43+5:302015-02-14T03:07:43+5:30
महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) जुन्या पेठा, शिवाजी रोड, गावठाण या भागांसाठी ठेवण्यात आलेल्या दीड एफएसआयऐवजी तो अडीच एफएसआय
पुणे : महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) जुन्या पेठा, शिवाजी रोड, गावठाण या भागांसाठी ठेवण्यात आलेल्या दीड एफएसआयऐवजी तो अडीच एफएसआय अशी दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे पेठांमधील रखडलेल्या अनेक बांधकामांना मंजुरी मिळणार असल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम मागील ४ वर्षांपासून सुरू आहे. या आराखड्यावर आलेल्या ८४ हजार हरकतींवर सुनावणी घेऊन त्याचा अंतिम अहवाल तयार झाला आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या विशेष सभेमध्ये त्याचा फैसला होणार आहे. या आराखड्यामध्ये जुन्या पेठांसाठी दीडऐवजी अडीच एफएसआयची सुधारणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर पूर्वी रुंदीकरण झालेल्या रस्त्यांवर पुन्हा रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून सादर केलेल्या विकास आराखड्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेकमुळे अडीचऐवजी दीड एफएसआय ठेवण्यात आला, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. या चुकीची दुरुस्ती व्हावी याकरिता नगरसेवक संजय बालगुडे यांनी शहर सुधारणा समितीमध्ये ठराव दिला होता. तसेच, त्यांनी जुने वाडामालक, भाडेकरू यांचा मोर्चाही महापालिकेवर काढला होता.
विकास आराखडा प्रसिद्ध करण्यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांनी एफएसआय कमी केल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठविली होती. विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सध्या अस्तित्वात असलेल्या कडक नियमांमुळे दीड एफएसआयनुसारच परवानगी देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे मागील दोन वर्षांमध्ये मध्यवर्ती भागातील अनेक बांधकाम परवानग्या फाईलमध्येच अडकल्या होत्या. नियोजन समितीने ही सुधारणा केल्यामुळे आता या बांधकामांना परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता मुख्य सभेची मोहर त्यावर उमटणे आवश्यक आहे.