बिघाडामुळे पेठा, पर्वती परिसरातील बत्ती गुल्ल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 08:09 PM2019-06-13T20:09:21+5:302019-06-13T20:10:27+5:30

सुमारे ३ लाख वीजग्राहकांचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला.

petha,parvati without electric supply | बिघाडामुळे पेठा, पर्वती परिसरातील बत्ती गुल्ल 

बिघाडामुळे पेठा, पर्वती परिसरातील बत्ती गुल्ल 

Next
ठळक मुद्देपर्वती केंद्रात झाला बिघाड : दोन तास विद्युत पुरवठा विस्कळीत

पुणे : महापारेषण कंपनीच्या पर्वती येथील २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने, शहर मध्यवस्तीतील पेठा, सिंहगडरस्ता, पर्वती, धायरी या भागातील तब्बल अडीच लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. १२) मध्यरात्रीनंतर दोन तास खंडित होता. तर सुमारे ५० हजार वीजग्राहकांना महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून तत्काळ वीजपुरवठा करण्यात आला. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे डेक्कन, कोथरुड परिसरातील विद्युत पुरवठा गुरुवारी (दि. १३) दिवसभर विस्कळीत होता. 
महापारेषणच्या पर्वती उपकेंद्रातील पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मरमधे (पीटी) बुधवारी (दि. १२) मध्यरात्रीनंतर १ वाजून २३ मिनिटांनी बिघाड झाला. या बिघाडामुळे ट्रान्सफॉर्मर फुटला. पर्वती उपकेंद्रातून १३२ केव्ही रास्तापेठ जीआयएस उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. बिघाडामुळे विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने, पर्वतीसोबतच रास्ता पेठ उपकेंद्राचाही वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे सुमारे ३ लाख वीजग्राहकांचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला. त्यामधील सुमारे ५० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा मध्यरात्री दीडपर्यंत महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करून पर्यायी व्यवस्थेतून उपलब्ध करून दिला.
महापारेषणकडून २२० केव्ही पर्वती उपकेंद्रातीलतील नादुरुस्त पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मरवरील वीजभार त्याच ठिकाणी अतिरिक्त असलेल्या दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर घेण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने दोन तासांचा कालावधी लागला. काम पूर्ण झाल्यानंतर २२० केव्ही पर्वती व १३२ केव्ही रास्तापेठ उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. त्यानंतर बंद असलेले १३ उपकेंद्र व ३४ वीजवाहिन्यांवरील २ लाख ५० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्या टप्प्याने पहाटे सव्वातीन पर्यंत पूर्ववत करण्यात आला.
महापारेषणच्या १३२ केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीची (टॉवर लाईन) उंची वाढविण्याचे काम करण्यात येत असल्याने महापारेषणच्या कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. १३) सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. कोथरूड, वारजे व डेक्कनमधील बऱ्याच ठिकाणचा वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे शहरमध्यवस्ती, शहराच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील बऱ्याच ठिकाणचा वीज पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला होता. 

Web Title: petha,parvati without electric supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.