दहावीच्या परीक्षा घेण्यासाठी न्यायालयात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:12 AM2021-04-23T04:12:05+5:302021-04-23T04:12:05+5:30
कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने मागील वर्षी विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यावर पुण्यातील ...
कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने मागील वर्षी विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यावर पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) , महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एसएससी व एसएससी बोर्ड) यांसह देशातील इतर राज्यांतील मंडळानी सुद्धा दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, इयत्ता दहावी ते पदवीपर्यंतच्या गुणपत्रिका यांचा विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अहवालात केला जातो. दहावीची परीक्षा रद्द करणे म्हणजे विद्यार्थ्यांचा विकासाच्या पाया उध्वस्त करण्यासारखे आहे, असे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.
कोरोनामुळे पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब होणारच आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर केलेल्या निकालावर विद्यार्थी समाधान असतील तर त्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदवी परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय दिला होता; तोच निर्णय विविध मंडळांनी मान्य करत परीक्षा घेणे अपेक्षित होते. कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर येत्या मे, जून किंवा जुलै महिन्यात दहावीची परीक्षा घेणे शक्य आहे. त्यामुळे सर्व मंडळांनी इयत्ता दहावीची परीक्षा घ्यावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
------------
दहावीच्या परीक्षा रद्द करण याबाबतचे अधिकृत परिपत्रक अद्याप शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेले नाही. हे परिपत्रक प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.