अमिताभ बच्चन यांच्या विरोधात पुण्यात याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 12:50 PM2019-11-08T12:50:43+5:302019-11-08T12:52:02+5:30
वकिलांची जाहिरात केल्याप्रकरणी ‘जस्ट डायल' कंपनी आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पुणे : वकिलांची जाहिरात केल्याप्रकरणी ‘जस्ट डायल' कंपनी आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वकिलांची जाहिरातबाजी करण्यास कंपनीला मनाई करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. बच्चन हे जस्ट डाइलचे ब्रँड अँम्बेसिटर आहेत. त्यामुळे त्यांना देखील प्रतिवादी करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. वकील वाजेद खान यांनी बच्चन आणि ‘जस्ट डायल'चे व्ही. एस. एस. मणी यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. जाहिरात केल्यास वकिलांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाकडून नुकताच देण्यात आला आहे. बार कौन्सिलच्या नियम 36 प्रमाणे वकिलांना स्वत:ची जाहिरात करण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. जस्ट डायल 8888888888 या दूरध्वनी क्रमांकावरून वकील पुरविण्याचे काम करीत आहे. अर्जदारांची परवानगी न घेता त्यांचे नाव जस्ट डायलने फ्री लिस्टिंगमध्ये टाकले आहे. लिस्टमध्ये नाव येण्यासाठी 24 हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. पैसे देणा-या वकिलांची नावे यादीत वर येत आहे. त्यामुळे वकिलांमध्ये टॉपटेनची स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रतिवादी हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या जाहिरात करून वकिलांना पैसे मिळवून देत आहे, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. जस्ट डायलला वकिलांची आणि तक्रारदारांची जाहिरात करण्यात बंदी घालावी आणि प्रतिवाद्यांना न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात आदेश करावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आल्याचे अॅड. खान यांनी सांगितले.