‘सनबर्न’विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 02:41 AM2018-12-27T02:41:24+5:302018-12-27T02:41:38+5:30
गेल्या तीन वर्षांपासून वादग्रस्त ठरत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला याही वर्षी नागरिकांच्या विरोधाला सामना करावा लागत आहे.
पुणे - गेल्या तीन वर्षांपासून वादग्रस्त ठरत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला याही वर्षी नागरिकांच्या विरोधाला सामना करावा लागत आहे. लवळे येथे होत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना लागू असलेले नियम लावावेत, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
भाजपाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी अॅड. राहुल म्हस्के यांच्यामार्फेत परसेप्ट प्रा. लि. च्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत याचिकाकर्त्यांना अधिक कागदपत्रे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सनबर्न फेस्टिव्हल हा एक गैरसांस्कृतिक तसेच पाश्चात्य अस्वीकृत पद्धतीने राबविण्यात येणारा कार्यक्रम आहे. यामध्ये संस्कृतीचा ºहास होत आहे. फेस्टिव्हलमुळे पर्यावरण, वृक्ष, टेकड्या, डोंगर यांचे नुकसान होत आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.
मर्यादा ओलांडली
दहीहंडी, गणपती आणि इतर सणांच्या वेळी डीजी व डॉल्बीचा वापर करण्यावर अनेक निर्बंध घालण्यात येतात. मात्र सनबर्नमध्ये सर्रास डीजेचा वापर होतोे. ७० डेसिबलची मर्यादा देखील ओलांडली जाते. या कार्यक्रमातून कोणताही सामाजित संदेश जात नाही. कार्यक्रमाला बंदी घालावी, अशी आमची मागणी नाही, पण नियम सर्वांना सारखा असावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती याचिकाकर्ते नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.
सद्य परिस्थिती मध्ये लवळे गावाच्या परिसरात सनबर्न हा कार्यक्रम होण्याच्या मार्गावर असून या कार्यक्रमामुळे या परिसरातील तरुण पिढीवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे कार्यक्रम इथे होता कामा नयेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम या परिसरात आम्ही होऊ देणार नाही.
- भाऊ केदारी,
माजी उपसरपंच, लवळे