Pune: प्लास्टिकच्या फुलांविरोधात राष्ट्रीय हरित लवादात याचिका
By नम्रता फडणीस | Published: September 23, 2022 07:30 PM2022-09-23T19:30:04+5:302022-09-23T19:31:29+5:30
न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग व सदस्य विजय कुलकर्णी यांनी हा आदेश दिला...
पुणे : प्लास्टिकची आर्टिफिशियल फुले हे एक पॉलिथिन आहे. शासनाने व पर्यावरण विभागाने १०० मायक्रॉनच्या आतील पॉलिथीन प्लास्टिकवर बंदी घातली आहे. तर, त्यावरील प्लास्टिक वापरास परवानगी देण्यात आली आहे. पर्यावरणाची हानी करणाऱ्या व फूल उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांचा वाढता वापर हा पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याच्या याचिकेवर पर्यावरण मंत्रालय व पुण्यातील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाला म्हणणे सादर करण्याचे आदेश राष्टीय हरित लवादाने दिले. न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग व सदस्य विजय कुलकर्णी यांनी हा आदेश दिला.
शेतकरी राहुल पवार यांच्यातर्फे ॲड. सुधाकर आव्हाड, ॲड. चेतन नागरे, ॲड. सिद्धी मिरघे यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या फुलांचे प्रयोगशाळेत परीक्षण केले असता या फुलांच्या प्लास्टिकच्या पॉलिथिनची जाडी सरासरी २९ मायक्रॉनची आहे. याखेरीज, या फुलांसाठी ज्या रंगाचा वापर करण्यात येतो, तेही पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहेत. ही फुले खराब झाल्यानंतर नागरिकांकडून कचऱ्यात फेकण्यात येतात. या फुलांची रिसायकलची वेगळी प्रक्रिया नाही, आदी मुद्दे याचिकेत नमूद केले आहे.
त्यावर प्लास्टिकची फुले ही सिंगल यूजच्या प्लास्टिक बंदीच्या कायद्यात येऊन प्लास्टिकची फुले पर्यावरणास घातक असल्यास ते संपूर्ण भारतातच बंद व्हायला हवे, असे नमूद करत त्याबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालय व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिले आहे. या फुलांच्या बंदीबाबत काय पात्रता व निकष आहे, त्याबाबत म्हणणे मांडण्याचेही आदेशात नमूद करण्यात आल्याची माहिती ॲड. नागरे यांनी दिली.