प्रसिद्धीसाठी फेकल्या आमदार लक्ष्मण जगतापांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोलच्या बाटल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 01:23 PM2021-11-24T13:23:57+5:302021-11-24T13:25:20+5:30
तीन आरोपींपैकी दोघांना पिंपरी-चिंचवड शहरातून तर एकाला शहराच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आले आहे...
पिंपरी: आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांच्या कार्यालयावर मंगळवारी पेट्रोलने भरलेल्या बाटल्या फेकल्या होत्या. दुपारी तीन वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे ही घडली. राहुल राम साळुंके (वय ३९, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तीन आरोपींपैकी दोघांना पिंपरी-चिंचवड शहरातून तर एकाला शहराच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी केवळ नाव कमावण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्याप अटकेची आणि इतर कायदेशीर प्रक्रिया शिल्लक असून मूळ उद्देशापर्यंत पोलीस पोहोचले नाहीत. अटक प्रक्रिया पूर्ण करून आरोपींना न्यायालयात हजर करायचे आहे. त्यानंतर चौकशीत सर्व बाबी समोर येतील असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तसेच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात करण्यात आली होती. शहरात काही ठिकाणी नाका बंदी देखील करण्यात आली होती.
सांगवी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील पेट्रोलपंपाजवळ माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे ‘चंद्ररंग’ डेव्हलपर्सचे कार्यालय आहे. काल दुपारी पावणे तीनच्या सुमारास एका दुचाकी वाहनावरून तिघेजण आले, जगताप यांच्या कार्यालयासमोर थांबले. त्यातील दोघांनी कार्यालयाच्या दिशेने पेट्रोलने भरलेल्या बाटल्या फेकल्या आणि त्यानंतर ते अज्ञात तिघेजण घटनास्थळावरून पळून गेले होते.