पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला लुटणाऱ्यांना वाईवरुन अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:10 AM2020-12-29T04:10:07+5:302020-12-29T04:10:07+5:30
पुणे : पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड जबरदस्तीने चोरुन नेणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी वाई येथून अटक ...
पुणे : पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड जबरदस्तीने चोरुन नेणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी वाई येथून अटक केली आहे.
कानिफनाथ विनोद महापुरे (वय २३, रा. नाना पेठ) आणि सोहेल ऊर्फ एस. एम. सलीम मुल्ला (वय १९, रा. शिवाजीनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ९ हजार ५०० रुपये, कोयता व मोपेड जप्त केली आहे.
कोंढवा येथील एस. के. ऑटो केअर पेट्रोल पंपावरील कर्मचारी २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता पैसे मोजत बसला होता. यावेळी दोघे जण दुचाकीवरुन आले व त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील पेट्रोल पंपावर जमा झालेली १४ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरुन नेली होती. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील व शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता.
तपास पथकातील अंमलदार आदर्श चव्हाण व सुदाम वावरे यांना दोघे संशयित आरोपी हे वाई येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हवालदार रमेश गरुड, संजीव कळंबे, सुदाम वावरे, आदर्श चव्हाण यांनी वाई येथे त्यांच्या शोध घेऊन दोघांना पकडले. सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी आरोपींकडून चोरीस गेलेली रोकड, कोयता व दुचाकी जप्त केली आहे.