पेट्रोल दरवाढीमुळे आम्हीही अस्वस्थ : पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 08:26 PM2018-05-26T20:26:50+5:302018-05-26T20:26:50+5:30
पेट्रोलचे वाढते दर आम्हालाही अस्वस्थ करतात.
पुणे : पेट्रोलचे वाढते दर आम्हालाही अस्वस्थ करतात. विरोधात होतो तेव्हा व आता सत्तेत आहे तरीही आम्हाला या इंधनदरवाढीविषयी कायमच चिंता वाटत आली आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकार हे या दरवाढीवर समन्वयाने नक्की मार्ग काढतील असा विश्वास महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारला ४ वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त केंद्राच्या कामगिरीचा मुंडे यांनी शनिवारी आढावा घेतला. स्वच्छ भारत संकल्पनेपासून ते बेटी बचाव, बेटी बढाव योजनेपर्यंत अनेक योजनांची त्यांनी आकडेवारीसह माहिती दिली.यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी भीमराव तापकीर, तसेच भारतीय जनता पाटीर्चे शहराध्यक्ष योगेश गोगावले यावेळी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, राज्य सरकारने पेट्रोलवर अनेक कर लावले आहेत. ते पैसे विकासकामांसाठी वापरले जातात. तो निधी कमी करायचा तर त्याचा पर्यायही शोधायला हवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात केंद्र सरकारशी बोलत आहेत. दर कमी व्हायला पाहिजेत असेच आमचेही मत आहे. केंद्र व राज्य यांच्या समन्वयामधून या विषयात नक्की मार्ग निघेल.
रोज चारच तास झोपते तरी....
आमचे बॉस दिवसाचे १८ तास काम करतात, त्यामुळे आपणही तेवढेच काम करतो. मंत्री झाल्यापासून मी रोज फक्त ४ तासच झोप घेते. तरीही फिट आहे असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.