एचपीसीएलमधून पेट्रोल चोरी
By admin | Published: October 10, 2016 02:10 AM2016-10-10T02:10:23+5:302016-10-10T02:10:23+5:30
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेडच्या लोणी काळभोर टर्मिनलच्या लोणी काळभोर ते सोलापूर (पाकणी) येथे पेट्रोलियम पदार्थ वाहून
लोणी काळभोर : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेडच्या लोणी काळभोर टर्मिनलच्या लोणी काळभोर ते सोलापूर (पाकणी) येथे पेट्रोलियम पदार्थ वाहून नेणाऱ्या पाइपलाइनवर चोरट्यांनी व्हॉल्व्ह लावून चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी (दि. ८) सकाळी उघडकीस आला असून या ठिकाणावरून किती लिटर पेट्रोल, डिझेल, रॉकेलची चोरी झाली, याबाबत नक्की माहिती मिळवण्याबाबत आज सकाळपर्यंत एचपीसीएलचे पदाधिकारी असमर्थ होते.
या चोरीसंदर्भात हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेड मुंबईच्या पुणे - सोलापूर पेट्रोल पाइपलाइनच्या लोणी काळभोर येथील परिचालन अधिकारी मयूरी महादेव शहाणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ - ३० वाजण्याच्या सुमारास लाइन वॉकर देविदास रामचंद्र कामठे (रा. लोणी काळभोर) हे लाइन वॉकिंग करीत असताना त्यांना लोणी काळभोर गावच्या रूपनरवस्तीनजीक पाइपलाइन चॅनल १६७.५ येथे पेट्रोलचा वास व हवेचा आवाज आल्याने त्यांनी ही बाब सुपरवायझर भरत बबन कामथे (रा. सासवड, ता. पुरंदर) यांना कळवली. त्यांनी तत्काळ पुणे व सोलापूर येथील कंट्रोलरूमशी संपर्क साधला. कंट्रोलरूमच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ प्रबंधक रघुपती व अमित निमदेव यांना कळवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मयूरी शहाणे यांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पाइपलाइन बंद केली.
त्यानंतर सर्व पदाधिकारी पाइपलाइन फुटलेल्या ठिकाणी पोहोचले. येथे पाहणी केली असता त्यांना सुमारे दोन फूट खोलीचा खड्डा आढळून आला. तेथून जात असलेल्या पाइपलाइनवर एक व्हॉल्व्ह लावलेला तसेच खड्ड्यांत पेट्रोल साचलेले दिसले. तेव्हा या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणच्या पाइपलाइनचेनुकसान करून कोणीतरी पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची खात्री पटल्याने शहाणे यांनी भा.दं.वि.क. ३७९, ५११ व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीस प्रतिबंध कायदा कलम ३, पेट्रोलियम व मिनरल पाइपलाइन अॅक्ट १९६२ चे कलम ३ (४), १५ (२) अन्वये फिर्याद दिली आहे.
अहोरात्र गस्त तरीही चोरी : कंपनीच्या कोणाचा हात असणार?
पेट्रोल, डिझेल, रॉकेलची वाहतूक करीत असलेल्या या पाइपलाइनच्या देखरेखीसाठी जागोजागी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असून ते अहोरात्र गस्त घालत असतात. तसेच यांमधून होणारे पेट्रोलियम पदार्थाचे वहन हे संगणक प्रणालीला जोडलेले असते. या पाइपलाइनवर कोणी होल पाडून चोरी करण्याचा प्रयत्न केला तर टर्मिनलमधील संगणक प्रणाली त्वरित हे ठिकाण दर्शवते. असे असताना हे चोरीचे प्रकार होतात कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरक्षारक्षकांची नेहमीप्रमाणे गस्त होती. या पाइपलाइनमधून कोणत्या वेळी कोणता पेट्रोलियम पदार्थाचे वहन होणार व बंद कधी होणार, याची माहिती असते. तसेच या पाइपलाइनवर व्हॉल्व्ह बसवणे हे कोणा ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. या सर्व बाबींचा विचार केला तर या प्रकरणांत कंपनीचा एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.