पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, मतदानासाठी अवघे काही तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 05:53 AM2017-11-17T05:53:37+5:302017-11-17T05:54:00+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचाला असून मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचाला असून मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी उमेदवारांची चांगलीच धावपळ सुरू आहे. त्यातच विद्यापीठाची ही निवडणूक पक्षीय राजकारणाच्या पलीकडे गेल्याने कोणाचा विजय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
विद्यापीठाच्या निवडणूक विभागाकडून निवडणुकीची तयारी केली असून येत्या १९ नोव्हेंबर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पदवीधरांच्या निवडणुकीसाठी विद्यापीठांतर्गत येणाºया पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये ५८ मतदान केंद्रे आहेत. विद्यापीठाकडे ४९ हजार ७०० पदवीधर मतदारांची नोंदणी झाली असून, अधिकाधिक मतदारांनी मतदानासाठी येण्यासाठी सर्व उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क साधला जात आहेत. संस्थाचालक प्रतिनिधींसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक या प्रमाणे मतदान केंद्र असून, एकूण २२९ मतदार मतदान करणार आहेत. यंदा प्रथमच नव्या विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निवडणूक घेतली जात आहे. अनेक वर्षांपासून सक्रिय असणाºया व्यक्ती यंदा निवडणूक लढवत नाहीत. त्यामुळे यंदा नवीन चेहºयांना सधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधू प्रसेनजित फडणवीस हे पदवीधरांमधून निवडणूक लढवत आहेत. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणारे एकता व विद्यापीठ विकास मंच या पॅनलकडून एकत्र निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे एकता पॅनलचे माजी अधिसभा सदस्य संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर यांच्यासह अहमदनगर व नाशिक येथून बापूसाहेब मायके, राजू पानमंद, तानाजी वाघ तसेच विश्वनाथ पाडवी व बागेश्री मंठाळकर निवडणूक लढवत आहेत. तसेच डॉ. श्यामकांत देशमुख, सोमनाथ पाटील व दीपक शहा आदी उमेदवार संस्थाचालक प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवत आहेत. एकता पॅनलबरोबर निवडणूक लढवणाºया काही शैक्षणिक संस्थांनी बाहेर पडून विद्यापीठ प्रगती पॅनल तयार केले आहे. या पॅनलमधून अनिल विखे, क्षितिज घुले, अभिषेक बोके, प्रकाश पाटील, संदीप शिंदे, युवराज नरवडे, भाग्यश्री कानडे, प्रल्हाद बर्डे, हेमंत दिघोळे, मनीषा कमानकर हे उमेदवार पदवीधार मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. संस्थाचालक प्रतिनिधी म्हणून या पॅनलमधून प्रवरानगर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अशा शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी निवडणुकीत आहेत.
कोण होणार विजयी ?
पदवीधरांचे मतदार हे उमेदवारांकडून व शैक्षणिक संस्थांकडून नोंदविण्यात आलेले आहेत. त्यामुळे
ज्यांनी अधिकाधिक मतदारांची नोंदणी केली आहे, तसेच संबंधित मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत घेऊन येण्यात जे यशस्वी होणारे आहेत; असेच उमेदवार विजयी होणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी ५ ते १0 मतदारांमागे एक व्यक्ती अशी यंत्रणा उभी करून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली असल्याचे बोलले जात आहे.
विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये पदवीधर प्रकारात जयकर ग्रुप प्रणीत विद्यापीठ विकास मंडळ उतरणार आहे. या मंडळाकडून पदवीधर गटाच्या निवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यांना विविध संस्था-संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मंडळाकडून बाकेराव बस्ते, भारत करडक, योगेश लांडे, तर सुभाष चिंधे, अमोल खाडे, तबस्सुम इनामदार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, अशी माहिती विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.