‘पीएफ’प्रकरणी तिघा मालकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2016 01:27 AM2016-10-04T01:27:17+5:302016-10-04T01:27:17+5:30
कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील जमा रक्कम परत मिळण्याच्या दाव्यातील अर्जावर लाभधारक व्यक्तीचे बँक खातेक्रमांक न देता दुसऱ्याच व्यक्तीचे खातेक्रमांक दिले
पिंपरी : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील जमा रक्कम परत मिळण्याच्या दाव्यातील अर्जावर लाभधारक व्यक्तीचे बँक खातेक्रमांक न देता दुसऱ्याच व्यक्तीचे खातेक्रमांक दिले. बनावट पॅन कार्डच्या छायांकित प्रती देऊन कंपनीच्या मालकांनी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कार्यालयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन कंपन्यांच्या मालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोत इंडस्ट्रीजचे मालक एस. पी. खोत, साई पॅकेजिंगचे मालक संभाजी पावसे, तसेच एस. पी. कॉन्ट्रॅक्टर्स अॅन्ड सप्लायर्सचे मालक शिशुपाल यादव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत आकुर्डी, प्राधिकरणातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे सहायक भविष्यनिधी आयुक्त रितेश पावा यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तीनही उद्योजकांच्या कंपनीतील काही कामगारांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्यासाठी दावा केला होता. मात्र, या उद्योजकांनी या दाव्या संदर्भात केलेल्या अर्जावर लाभधारक कामगारांचा खाते क्रमांक न देता दुसरेच खाते क्रमांक दिले. तसेच बँकेचे खाते एकापेक्षा अधिक व्यक्तींना देऊन पीएफ कार्यालयाकडे बनावट पॅन कार्डच्या छायांकित प्रती सादर केल्या होत्या. (प्रतिनिधी)