फार्मासिस्टना कोविड योद्धा म्हणून लसीकरण प्रक्रियेत प्राथमिकता मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:08+5:302021-05-28T04:09:08+5:30
मुख्यमंत्र्यांना पत्र : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणेच्या माजी विद्यार्थी संघटनेचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या ...
मुख्यमंत्र्यांना पत्र : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणेच्या माजी विद्यार्थी संघटनेचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या एक वर्षापासून फार्मासिस्ट कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहेत. मेडिकल / पॅरामेडिकल क्षेत्रामधील सर्व प्रतिनिधींना कोविड योद्धा म्हणून केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिली आहे. औषध विभागामध्ये सेवा देणाऱ्या फार्मासिस्टना केंद्र व राज्य सरकारने यामधून वगळले आहे. त्यामुळे भारतातील नऊ लाख औषध व्यावसायिक व सेवा देणारे लसीकरण प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. औषध व्यावसायिकांना लसीकरण प्रक्रियेत प्राथमिकता मिळावी, अशी मागणी करणारे पत्र भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणेच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.
फार्मासिस्ट औषध निर्माण करणे, औषधे विक्री, औषध वितरण, औषध समुपदेशन इ. मध्ये अहोरात्र सेवा देत आहेत. याशिवाय गरजूंना मोफत औषधसेवा, मोफत सॅनिटायझर व मास्क वाटप तसेच दवाखान्यामध्ये पेशंटला दाखल करण्यासाठी बेड उपलब्धतेची माहिती, रक्तपुरवठा, प्लाझ्मादान, ऑक्सिजन अशा कार्यामध्ये आजही झोकून देऊन काम करत आहेत. औषध पुरवठा करणाऱ्या औषध निर्मात्यालाच शासकीय व्यवस्थेने आजारी केले आहे. दोनशेपेक्षा अधिक फार्मासिस्टना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. दोन हजारांहून अधिक फार्मासिस्ट कुटुंबीयांना या आजाराने बाधित केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील तमाम फार्मासिस्टचे मानसिक खच्चीकरण होत आहे, असे अध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.