फार्मासिस्टनेच मेडिकलमधील औषधे चाेरली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 03:34 PM2020-03-08T15:34:09+5:302020-03-08T15:35:59+5:30
जहांगीर हाॅस्पिटलमधील मेडिकलच्या दुकानातील औषधे चाेरणाऱ्या फार्मासिस्टला पाेलिसांनी अटक केली आहे.
पुणे : जहांगीर हॉस्पिटलमधील मेडिकलच्या दुकानातील औषधे चोरून नेत असताना एका फार्मासिस्टला सुरक्षा रक्षकांनी पकडले. कोरेगाव पार्क पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुयश हिराचंद पांढरे (वय २८, रा़ आंबेगाव, कात्रज) असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी अॅलन थॉमस (वय ५७, रा़ वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, जहांगीर हॉस्पिटलमधील मेडिकलच्या दुकानातील औषधांच्या स्टॉकमध्ये तफावत आढळत होती. पण, ही औषधे नेमकी जातात कोठे हे समजत नव्हते. त्यामुळे मेडिकल स्टोअर्समधून बाहेर पडणाऱ्यांवर तेथील सुरक्षा विभागाने बारकाईने लक्ष ठेवले होते. सुयश पांढरे हा शनिवारी सकाळी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना सुरक्षारक्षकाने त्याची तपासणी केली. तेव्हा त्याच्याकडे तोंडावर लावणारे मास्क, इंजेक्शन, टॅब्लेटस अशी एकूण ३५ हजार ७५० रुपयांची औषधे सापडली. त्याची पावती त्याच्याकडे नव्हती. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने स्टोअर्समधून चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार हॉस्पिटलच्या सुरक्षा विभागाने त्याला कोरेगाव पार्क पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यापूर्वीही त्याने हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर्समधून औषधे चोरुन नेली आहे काय, याची तपासणी सीसीटीव्हीच्या मदतीने करण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव अधिक तपास करीत आहेत.