स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांवर ‘पीएचडी’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 05:32 PM2019-11-28T17:32:45+5:302019-11-28T17:34:45+5:30
लाखो विद्यार्थ्यांकडून केवळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून कायमस्वरूपी रोजगार मिळवण्याचा प्रयत्न
पुणे : महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी केवळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून कायमस्वरूपी रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, सर्वांनाच स्पर्धा परीक्षांमध्ये यश येत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर निष्कर्ष काढण्याचे काम एका अमेरिकन विद्यार्थ्यांने हाती घेतले असून तो हार्वर्ड विद्यापीठात पीएचडी. करीत आहे.
जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांएवजी सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न तरुणांकडून केला जात आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागीतील तरुण- तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतल्या जाणाºया विविध परीक्षांमधून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, केंद्र व राज्य शासनाकडून खूप कमी जागांवर भरती केली जाते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमधून अपयश येणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामुळेच हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थी कुणाल मंगल यांनी पीएच. डी.साठी या विषयाची निवड केली आहे. सध्या ते तरुणांशी संवाद साधत आहेत.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील विद्यार्थीच मोठ्या संख्येने या परीक्षांचा अभ्यास का करतात? आदी प्रश्न समोर ठेवून केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर तमिळनाडू, दिल्ली, बिहार, छत्तीसगड या राज्यातील तरुण-तरुणींशी कुणाल मंगल संवाद साधत आहेत. त्याचप्रमाणे त्यासंदर्भातील आकडेवारी जमा करण्याचे कामही त्यांनी सुरू आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कुणाल मंगल हे विविध राज्यात फिरून याबाबतची माहिती जमा करीत आहेत. मागील पाच महिन्यांपासून एमपीएससी स्टुडंट्स राईट्सच्या माध्यमातून कुणाल मंगल यांना संशोधनासाठी आवश्यक असलेली अचूक माहिती उपलब्ध होत आहे.