पीएच.डी. फेलाेशिप सीईटीवर बहिष्कार टाकणार; ‘बार्टी’कडे अर्ज केलेल्या उमेदवारांचा निर्णय
By प्रशांत बिडवे | Published: January 8, 2024 08:23 PM2024-01-08T20:23:19+5:302024-01-08T20:23:42+5:30
बार्टी संस्थेने परीक्षा आणि मुलाखतीची अट घालून फक्त दाेनशे विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला त्याविराेधात विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयासमाेर आमरण उपोषण केले
पुणे : ‘बार्टी’तर्फे एस.सी. प्रवर्गातील पीएच.डी. संशाेधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाते. राज्यातील सारथी, महाज्याेती ‘टीआरटीआय’ या संस्थांनी २०२२ वर्षात पीएच.डी.साठी नोंदणी केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती जाहीर केली. मात्र, ‘बार्टी’तर्फे विद्यार्थ्यांना परीक्षा आणि मुलाखतीची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे २०२२ मध्ये अधिछात्रवृत्तीसाठी ‘बार्टी’कडे अर्ज केलेल्या उमेदवारांनी येत्या १० जानेवारी राेजी हाेणाऱ्या सीईटी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आली.
पुणे श्रमिक पत्रकार संघात आयाेजित पत्रकार परिषदेत प्रवीण गायकवाड, ईश्वर अडसूळ यांनी ही माहिती दिली. यावेळी सुवर्णा नडगम, कल्याणी वाघमारे, किशाेर वाघमारे, किशाेर गरड आदी विद्यार्थी उपस्थित हाेते. बार्टी संस्थेने परीक्षा आणि मुलाखतीची अट घालून फक्त दाेनशे विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला त्याविराेधात आम्ही बार्टी कार्यालयासमाेर आमरण उपोषण केले.
सलग तीन महिने धरणे आंदाेलन केल्याने ‘बार्टी’ने काही दिवसांपूर्वी सीईटी रद्दचा निर्णय घेतला हाेता. मात्र, त्यानंतर महासंचालकांनी परीक्षा रद्दचा निर्णय मागे घेतला. तसेच येत्या १० जानेवारी राेजी विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा द्यावी, असे नाेटिफिकेशन काढत विद्यार्थ्यांची दिशाभूल केली आहे, असे प्रवीण गायकवाड याने सांगितले.
सेट, नेट तसेच पेट आदी परीक्षा पात्र झाल्यानंतर पीएच.डी.साठी नाेंदणी करता येते. त्यामुळे आणखी काेणत्या परीक्षेची अट लावणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना संशाेधनासाठी पैसा लागताे. सारथी, महाज्याेती, बार्टी, टीआरटीआय या संस्थांकडे अर्ज केलेल्या सरसकट विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती द्यावी, असे ईश्वर अडसूळ याने सांगितले.