पीएच.डी. संशोधनासाठी पायाभूत सुविधा
By admin | Published: May 13, 2017 05:05 AM2017-05-13T05:05:22+5:302017-05-13T05:05:22+5:30
पीएच.डी.चे संशोधन योग्य होत नसल्याची केवळ टीकाच करून थांबणार नसून, या संशोधनासाठी विद्यापीठांना चांगल्या पायाभूत सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीएच.डी.चे संशोधन योग्य होत नसल्याची केवळ टीकाच करून थांबणार नसून, या संशोधनासाठी विद्यापीठांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. खासगी कंपन्यांच्या उत्कृष्ट लॅबची मदत पीएच.डी. संशोधनासाठी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी स्पष्ट केले.
फर्ग्युसन महाविद्यालयातील भारतीय विज्ञान संमेलनाचे उद्घाटन विनोद तावडे, केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ व विज्ञानभारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे उपस्थित होते.
तावडे म्हणाले, ‘‘नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये बोर्ड आॅफ रिसर्च याची तरतूद करण्यात आलेली आहे. याद्वारे पीएच.डी.ची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पीएच.डी.च्या संशोधनासाठी विद्यापीठांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर चांगल्या कंपन्यांमधील लॅबचीही मदत घेण्यात येईल. कॉपी पेस्ट संशोधन होऊ नये, यासाठी यूजीसीने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.’’
संशोधनासाठी ६ टक्के निधीची तरतूद केली पाहिजे;मात्र प्रत्यक्षात ०.२१ टक्के इतकाच निधी संशोधनासाठी उपलब्ध करून दिला जात आहे. या निधीचे प्रमाण दोन वर्षांत ४ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
विजय भटकर म्हणाले, ‘‘विज्ञान भारती संमेलनाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. भोपाळ येथे २००७मध्ये या संमेलनाची सुरुवात झाली. या संमेलनात संस्कृत, हिंदी, मराठी आदी भारतीय भाषांमध्ये शोधनिबंध मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या संमेलनातून निश्चितच नवी दृष्टी मिळेल.’’