PMC: पीएच.डी, एम.टेक झालेले तृतीयपंथी बनणार पालिकेचे गार्ड; आयुक्तांच्या हस्ते दिले जाणार नियुक्तिपत्र
By राजू हिंगे | Published: July 24, 2023 06:41 PM2023-07-24T18:41:23+5:302023-07-24T18:54:53+5:30
पुणे : महापालिकेच्या सेवेत उच्चशिक्षित १० तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना कामावर घेतले जाणार आहे. त्यामध्ये पीएच.डी., एमटेक, बीएससी शिक्षण झालेल्या ...
पुणे : महापालिकेच्या सेवेत उच्चशिक्षित १० तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना कामावर घेतले जाणार आहे. त्यामध्ये पीएच.डी., एमटेक, बीएससी शिक्षण झालेल्या तृतीयपंथीयांचा समावेश आहे. महापालिका आयुक्तांच्या हस्ते येत्या १ ऑगस्ट रोजी त्यांना नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत.
महापालिकअंतर्गत येणारी मुख्य इमारत, शाळा, उद्याने, नाट्यगृहे, क्षेत्रीय कार्यालये, पाण्याच्या टाक्या, जलतरण तलाव, ॲम्नेटी स्पेसच्या जागा यांसारख्या सुमारे ५०० आस्थापना आहेत. सध्या पुणे महापालिकेत खासगी सुरक्षारक्षकांची संख्या १ हजार ६४०, तर कायमस्वरूपी ३२० असे एकूण १ हजार ९६० सुरक्षारक्षक आहेत. पालिकेने यापूर्वी दहा तृतीयपंथी सुरक्षारक्षक घेतले आहेत. पालिकेचे कमला नेहरू हॉस्पिटल, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, पालिका भवन, अनधिकृत बांधकाम निर्मूलन व अतिक्रमण विभागाची कारवाई यावर तृतीयपंथीयांची नेमणूक केली जाणार आहे.
शहरातील तृतीयपंथीय वर्गासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांची कमिटी तयार करून कर्मचारी, अधिकारी व तृतीयपंथी कामगार यांच्यात सलोखा व सामाजिक स्नेह राहावा, यासाठी जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. नवीन मुलाखती घेतलेल्या तृतीयपंथीयांचे उच्च शिक्षण झालेले आहे. काही ठिकाणी हे लोक नोकरीदेखील करत होते. मात्र नोकरीच्या ठिकाणी होणारी हेळसांड पाहून त्यांनी नोकऱ्या सोडल्या. त्यानुसार या लोकांनी महापालिकेत नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिकेच्या सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिली.