जागा घटल्यामुळे पीएच.डी.ची वाट आता अवघड; स्पर्धा तीव्र
By admin | Published: July 28, 2016 04:12 AM2016-07-28T04:12:40+5:302016-07-28T04:12:40+5:30
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नवीन नियमावलीनुसार प्राध्यापकांकडील एम. फिल., पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांच्या जागा कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सावित्रीबाई
पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नवीन नियमावलीनुसार प्राध्यापकांकडील एम. फिल., पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांच्या जागा कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठांतील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणार आहे. त्यामुळे एम.फिल., पीएच.डी. प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार असून, विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळविण्यासाठी भटकावे लागणार आहे.
यूजीसीच्या नियमावलीनुसार प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर व असोसिएट प्रोफेसर यांना एम.फिल.,पीएच.डी.साठी सरसकट आठ विद्यार्थी घेता येत होते. उपलब्ध जागांच्या तुलनेत अधिक विद्यार्थी विषयांमध्ये संशोधनाच्या उद्देशाने एम.फिल.,पीएच.डी. साठी अर्ज करत होते. परंतु, विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता. त्यात आता नवीन नियमावलीनुसार प्राध्यापकांडील जागा कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळविण्यासाठी भटकावे लागणार आहे. त्यातच विद्यापीठांशी संलग्न संशोधन केंद्रांमध्ये दोन पात्र मार्गदर्शक असल्याशिवाय आता संबंधित केंद्राला मान्यता दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे या पुढील काळात संशोधन केंद्रामधील मार्गदर्शकांना त्यांच्याच केंद्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार आहे.
युजीसीच्या बदलेल्या नियमानुसार एम.फिल., पीएच.डी.च्या गुणवत्तेत वाढ होणार असली तरी या निर्णयामुळे विद्यापीठातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होणार आहे.
नवीन नियमानुसार प्रोफेसर असणाऱ्या मार्गदर्शकांना पीएच.डी.साठी ८ एम.फिल.साठी ३ विद्यार्थी घेता येतील. तर असोसिएट प्रोफेसर यांना पीएच.डी.चे ६ तर एम.फिल.चे २ विद्यार्थी घेता येतील. तसेच असिस्टंट प्रोफेसर यांना पीएच.डी.चे ४ आणि एम.फिल.चा १ विद्यार्थी घेता येईल. असोसिएट प्रोफेसर,असिस्टंट प्रोफेसर यांच्याकडे पीएच.डी.च्या प्रत्येकी ८ आणि एम.फिल.च्या प्रत्येकी ५ जागा होत्या. परंतु, त्यात घट झाली आहे. परिणामी विद्यापीठाकडील एम.फिल.,पीएच.डी.च्या जागाही कमी झाल्या आहेत.
युजीसीने मार्गदर्शकांकडील जागा कमी करण्याच्या निर्णया घेतला असला तरी एम.फिल.,पीएच.डी.पूर्ण करण्यासाठीचा कार्यकाल वाढविला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिक कालावधी मिळेल. तसेच नव्या नियमावलीनुसार महिलांना व दिव्यांग विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिक संधी मिळणार आहे.संशोधन करणा-या गर्भवती महिलांना २४० दिवसांपर्यंत सुट्टी दिली जाणार आहे.
(वृत्तसंस्था)
विद्यापीठाच्या जागा झाल्या कमी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे २००९ ते २०१६ या कालावधीत ५ हजार ७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यातही २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात ३ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे विद्यापीठाकडे पीएच.डी.च्या सुमारे ३ हजार जागा शिल्लक होत्या. परंतु, नव्या नियमावलीमुळे २ हजार ८०० जागाच उपलब्ध होऊ शकतात. एम.फिल.च्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होईल, असे सूत्रांनी सांगितले.
महाविद्यालयात लेक्चर घेण्यामध्ये असोसिएट व असिस्टंट प्रोफेसर यांच्यात केवळ एका तासाचा फरक आहे. त्यामुळे एम.फिल., पीएच.डी.साठी विद्यार्थी अॅलॉट करण्याबाबत घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे.
- हेमलता मोरे, सचिव, पुटा
यूजीसीने विद्यापीठाशी निगडित असणारे निर्णय विद्यापीठ प्रतिनिधींना विश्वासात घेऊन घ्यायला हवेत. क्षमता व पात्रता असूनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक उपलब्ध होणार नाहीत.
-डॉ. मनोहर जाधव,
समन्वयक, कला शाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या वेळेचा विचार करता. गुणवत्तेच्या दृष्टीकोणातून युजीसीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे दिसत आहे. मात्र,देशातील विद्यापीठ व महाविद्यालयातील रिक्त होणाऱ्या प्राध्यापकांच्या जागांचा विचार करून उपलब्ध सांख्यिकी माहितीच्या आधारे याबाबत निर्णय गरजेचे आहे. काही विषयातील नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवार मिळत नाहीत, अशावेळी पीएच.डी.चे उमेदवारांना संधी द्यावी लागते. त्यामुळे पीएच.डी.करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करणे योग्य नाही.
- डॉ. अरुण अडसूळ, शिक्षणतज्ज्ञ