पीएच.डी. गाईड नोंदणीसाठी मुदतवाढ बिनकामाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:11 AM2021-07-27T04:11:02+5:302021-07-27T04:11:02+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यापीठाने पीएच.डी. मार्गदर्शक (गाईड) नोंदणीसाठी ३० जुलैपर्यंत ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यापीठाने पीएच.डी. मार्गदर्शक (गाईड) नोंदणीसाठी ३० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बदललेल्या नियमावलीनुसार मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्याची प्रक्रियाच राबविली जात नसल्याने मुदतवाढीचा कोणताही उपयोग नाही, अशा प्रतिक्रिया प्राध्यापकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
पुणे विद्यापीठातर्फे मार्गदर्शकांकडे उपलब्ध असलेल्या जागांची नोंदणी करण्यासाठी पूर्वी मुदत देण्यात आली होती. मात्र, मार्गदर्शक व संशोधन केंद्र यांना रिक्त जागांची माहिती अद्ययावत करण्यासाठी दिलेल्या अंतिम मुदतीनंतर नव्याने जागा निर्माण झाल्या आहेत. तसेच काही शिक्षकांना नव्याने मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त मार्गदर्शकांनी विद्यापीठाच्या लिंकवर आपल्याकडे रिक्त असलेल्या जागांची माहिती ३० जुलैपर्यंत भरावी, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.
नव्याने मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळण्यासाठी सुधारित नियमावली तयार करण्यात आली. मात्र, या नियमावलीनुसार प्राध्यापकांकडून गाईड म्हणून मान्यता मिळण्याची प्रक्रिया राबविली जात नाही. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा प्राध्यापकांकडून व्यक्त केली जात आहे.
--------------------
विद्यापीठाने पीएच.डी. गाईडबाबत सुधारित नियमावली तयार केली असली तरी त्यानुसार नवीन मार्गदर्शकांना मान्यता मिळावी, याबाबतची कार्यवाही सुरू होणार नाही. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असल्याचा अनुभव येत आहे. तसेच मार्गदर्शकांसाठी अलिखित ५० किलोमीटरची अट अजूनही कायम ठेवली आहे. यात सुधारणा झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक उपलब्ध होणार नाहीत.
- डॉ. अजय दरेकर,अध्यक्ष, बेस्टा