पुण्यात शेकाप नवी झेप घेईल

By admin | Published: January 13, 2017 02:19 AM2017-01-13T02:19:52+5:302017-01-13T02:19:52+5:30

शेतकरी कामगार पक्षात इनकमिंग होणे ही स्वागतार्ह बाब असून प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नवी झेप

Phekap will take a leap forward in Pune | पुण्यात शेकाप नवी झेप घेईल

पुण्यात शेकाप नवी झेप घेईल

Next

पुणे : शेतकरी कामगार पक्षात इनकमिंग होणे ही स्वागतार्ह बाब असून प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नवी झेप घेईल. प्रत्येक गावात, शहरात पक्षाचे कार्य नेले जाईल, असे या पक्षाचे सरचिटणीस, आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे सांगितले.
संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड, राहुल पोकळे, शांताराम कुंजीर, श्रीमंत कोकाटे, अजय भोसले, सारिका भोसले, वासंती नलावडे आदी सुमारे ४५ पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या पटांगणात झालेल्या शेकाप मेळाव्यात शेकापमध्ये प्रवेश केला. त्या वेळी पाटील बोलत होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार विवेकानंद पाटील, संपतराव पवार-पाटील, पक्षाचे कार्यालयीन सचिव एस. व्ही. जाधव आदी व्यासपीठावर होते. फुले पध्दतीची पगडी, घोंगडी आणि नांगराची प्रतिकृती व संविधानाची प्रत देऊन गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
पाटील म्हणाले, ‘‘शेकापची स्थापना याच पुण्यात झाली होती. त्यामुळे जिजाऊ जयंतीच्या दिवशी पक्षाचा मेळावा घेण्यात आला. जिजाऊंनी सोन्याच्या नांगराने पुण्याची भूमी नांगरली होती. शेकापमधून आजवर अनेक लोक गेले. लोक म्हणतात की, शेकापमध्ये कार्यकर्ते येत नाहीत. पण मी पक्षाचा सरचिटणीस असताना पक्षात नव्याने आगमन होणे हे स्वागतार्ह आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत ३ वर्षे आमच्या बैठका सुरु होत्या. गायकवाड यांच्यासारखा आक्रमक कार्यकर्ता त्यांनी आम्हाला दिला.’’
गणपतराव देशमुख म्हणाले, परिवर्तनाच्या वाटचालीत हा मेळावा ऐतिहासिक आहे.
प्रवीण गायकवाड यांनी  शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे कोसळलेले भाव, महिलांवरील बलात्कार आदी मुद्दांचा ऊहापोह करत केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आपली पक्ष प्रवेशामागील भूमिका सांगताना ते म्हणाले, माझे वय ४५ झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडमधून मी पदमुक्त झालो.
अनेक कार्यकर्ते वेगळी भूमिका असलेल्या पक्षांमध्ये गेले. पण माझ्यासाठी शेकाप हेच योग्य व्यासपीठ असल्याने या पक्षात आलो. शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी जीवाचे रान करेन. या पुढच्या काळात शेतक-यांनी आत्महत्या केल्या तर सरकारला पळता भुई थोडी होईल, एवढे लोक घेऊन मंत्रालयात जाईन.
गायकवाड म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोषकांचे प्रतिनिधी आहेत. राज्यातील ब्राह्मणांची सत्ता उलथवून टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांचा गडकरी पुतळा करु. आजच्या ऐतिहासिक घटनेनंतर राज्य सरकारचा काऊंट डाऊन सुरु झाला आहे.
राहुल पोकळे म्हणाले, गडकरी पुतळा घटनेमागचा मास्टर माईंड शोधण्याविषयी मुख्यमंत्री बोलतात. त्यांना अस्मिता संभाजी महाराजांऐवजी गडकरींविषयी आहे. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमागील मास्टर माईंड त्यांना शोधता आलेला नाही.
मीनाक्षी पाटील, धैर्यशील पाटील, संपतराव पवार-पाटील, श्रीमंत कोकाटे, शांताराम कुंजीर आदींची भाषणे झाली. (वार्ताहर)

Web Title: Phekap will take a leap forward in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.