समाजवादाचे तत्त्वज्ञान संपणार नाही : डॉ. राजा दीक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:09 AM2021-06-23T04:09:19+5:302021-06-23T04:09:19+5:30
पुणे : काही काळापुरती केवळ समाजवादाच्या चळवळीला मरगळ आली म्हणून समाजवादाचे तत्त्वज्ञान संपणार नाही. इतिहास आपल्याला आशावादी बनवतो. निराशेचे ...
पुणे : काही काळापुरती केवळ समाजवादाच्या चळवळीला मरगळ आली म्हणून समाजवादाचे तत्त्वज्ञान संपणार नाही. इतिहास आपल्याला आशावादी बनवतो. निराशेचे कालखंड येतात. ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून पाहिले तर वर्तमान आशावादी वाटत राहातो. निराशेचा काळ आला म्हणून ती मूल्ये, ती तत्त्वे निरर्थक ठरत नाही. ही मूल्ये शाश्वत तत्त्वानुसार काळाच्या कसोटीवर खरी उतरतात आणि त्या चळवळीला पुन्हा एकदा बहर येतो. समग्र विचार करणारी भाईंची ही समाजवादी चळवळ आहे, असे विचार राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी मांडले.
लोकनेते भाई वैद्य यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त प्राचार्या नलिनी वैद्य समाजभिमुख शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार पुणे येथील रावसाहेब पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या वृंदा हजारे यांना आणि लोकनेते भाई वैद्य युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार सोशलिस्ट पार्टी इंडियाचे महामंत्री गौतम प्रितम यांना राज्य डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. अनुक्रमे रुपये दहा हजार आणि स्मृतिचिन्ह आणि रुपये पंधरा हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य सेना आणि भाई वैद्य फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य तसेच अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे प्रा. डॉ. शरद जावडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर भाई वैद्य यांच्या शैक्षणिक भाषणांचे व लेखांचे संकलन असलेल्या ‘समाजवादी शिक्षण हक्कासाठी लढा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रबोधन आणि परिवर्तन हे भाई वैद्य यांच्या कार्याची द्विसूत्री होती. ज्ञानप्रक्रियेचे लोकशाहीकरण व्हावे, हा भाईंचा मूळ गाभा होता. माझीही मूळ प्रेरणा तीच असल्याने विश्वकोश निर्मिती प्रक्रियेद्वारे खेडोपाडी आणि आदिवासींपर्यंत ही ज्ञानगंगा कशी पोहोचेल या दृष्टीने राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी जबाबदारी निभावेल, असा विश्वास डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केला.
डॉ. शरद जावडेकर म्हणाले, जागतिकीकरणाचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला होता. भाईंनी दाखवलेल्या दिशेमुळे समाजवादी चळवळ आजही तग धरून उभी आहे.
पुरस्कारार्थी गौतम प्रीतम हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. प्रा. प्रमोद दळवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि उपस्थितांचे आभार मानले.
------------------------------------------------------------------------
चौकट
अभिव्यक्ती स्वातंत्र्याला केलेले ‘लॉकडाऊन’ कधी उठणार?
कोरोनाचे लॉकडाऊन कधी ना कधी तरी संपुष्टात येईल. पण मोदी सरकार आणि त्यांच्या पिलावळीने आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ‘लॉकडाऊन’ केले आहे. ते कधी उठणार? हा खरा प्रश्न आहे,.. अशा शब्दांत डॉ. अभिजित वैद्य यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.
--------------------------------------