वक्तृत्वाची ‘फिनिक्स’ भरारी घेणारा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:23+5:302021-07-16T04:09:23+5:30

- डॉ. अविनाश भोंडवे, फ ॅमिली फिजिशियन, पुणे (माजी अध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र राज्य) ---------------------------------- विकास हा माझा १९७५ पासूनचा ...

The phoenix development of rhetoric | वक्तृत्वाची ‘फिनिक्स’ भरारी घेणारा विकास

वक्तृत्वाची ‘फिनिक्स’ भरारी घेणारा विकास

Next

- डॉ. अविनाश भोंडवे, फ ॅमिली फिजिशियन, पुणे (माजी अध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र राज्य)

----------------------------------

विकास हा माझा १९७५ पासूनचा मित्र. एसएससीपर्यंतची शाळा आणि प्री-मेडिकल कॉलेजेस वेगळी होती. पण मेडिकल शिक्षणासाठी बीजे मेडिकल कॉलेजला आम्ही एकत्र आलो. त्या काळात आम्ही रोजच एकत्र भेटायचो आणि चर्चा करायचो. साहित्य, सिनेमा, नेहमीच्या राजकीय घडामोडी यावर दीर्घ काळ गप्पा होत असत. विकासचे वाचन अफाट होते. त्याच्यामुळेच महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची आणि त्यांच्या सामाजिक चळवळीतील अनेक विचारवंतांची पुस्तके मी वाचली. या पुस्तकांतील मुद्दयांवर तो तळमळीने बोलत असे. माझ्या मध्यमवर्गीय मराठी विचारांना त्याच्यामुळे एक सामाजिक बैठक मिळाली, असे म्हटले तर वावगे होणार नाही.

बीजेमध्ये आम्ही चार-एक वर्षे असंख्य वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा केल्या. त्यामधील विषयांवर आम्ही सर्व बाजूंनी साधक बाधक चर्चा करायचो. अतिशय वेगळे मुद्दे मांडणे आणि ते मांडताना वेगळ्या शैलीत मांडणे, ही वैशिष्ट्ये आम्ही स्वत:हून निर्माण केली. त्यावेळी बीजेमधील वक्तृत्वाबाबत उत्सुक मुलामुलींना एकत्र करून ‘डिबेट सर्कल’ स्थापन केले होते. त्यामध्ये अनेकांची आम्ही ‘कंटेंट आणि प्रेझेंटेशन’ याबाबत तयारी करून घेत असू. या सर्कलमध्ये असलेले 20-22 जण आता महाराष्ट्रातील नामवंत डॉक्टर्स आहेत. काहींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. पण आजही त्यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषणे देताना बीजेमध्ये आम्ही समवेत गिरवलेल्या मुळाक्षरांची त्यांना आठवण होते.

बीजेतर्फे आम्ही जवळजवळ 100 वक्तृत्व स्पर्धांत पारितोषिके, ढाली, चषक कॉलेजला मिळवून दिले. या काळात महाराष्ट्रातील अनेक कॉलेजियन वक्त्यांशी मैत्री झाली. त्यातील कित्येकजण मिडिया, सिनेमा, लेखन, कविता, नाटक अशा कलाक्षेत्रांशी संबंधित नावाजले गेले आहेत. त्यातील अनेकांशी आजही संबंध टिकून आहेत. अशाचपैकी पुण्यातील 40 वक्त्यांची एक संस्था ‘फिनिक्स’ नावाने आम्ही स्थापन केली होती. त्याच्या बैठका आणि चर्चा अशोक विद्यालयात विकासच्या पुढाकाराने होत असत. महाराष्ट्राला थोर वक्त्यांची परंपरा आहे, त्यात भर टाकणे हा आमचा उद्देश होता.

त्यानंतरच्या काळात विकासशी होणार्‍या चर्चात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, प्राथमिक आणि उच्च शिक्षण, दलित चळवळ, महाराष्ट्रातील बहुजन समाजाची उपेक्षा, मराठी भाषेची अवहेलना अशा अनेक गोष्टींवर आमच्या चर्चा होत राहिल्या. या सर्व क्षेत्रात विकासचा व्यासंग मला नेहमीच चकित करत असे. तळागाळातल्या वर्गाला शिक्षणाद्वारेच उच्च स्थान प्राप्त होईल, ही महात्मा फु ल्यांची शिकवण, त्याचे प्रेरणास्थान होते. विकासने केलेल्या आंतरराष्ट्रीय सभा, त्याची तिथे झालेली भाषणे, राष्ट्रीय स्तरावर त्याने जमवलेल्या नामांकित व्यक्तींच्या ओळखी आणि मैत्रीपूर्ण नाती अचंबित करणारी होती. कोव्हिडच्या सुरुवातीला ‘करोना प्रश्नोत्तरे’ या सदरात मार्गदर्शन करताना केलेल्या भाषणांसाठी आणि लेखांसाठी विकासने मला कित्येक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या.

कॉलेजच्या काळातील या माझ्या मित्राच्या कार्याचा वटवृक्ष मी अनुभवलेला आहे. पण दुर्दैवाने काळाने त्याच्यावर आघात केला आणि त्याला आपल्यापासून दूर नेले. विकासच्या अनुपस्थितीने माझ्यासारख्या अनेक मित्रांच्या आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील वैचारिक विकासाची वाटचाल नक्कीच खुंटणार आहे.माझ्या या परममित्राला आदरांजली!

Web Title: The phoenix development of rhetoric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.